मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्यभरातील जनतेला चिंतामुक्त करणारा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांना लागू असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती सर्वांसाठी वाढविण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची घोषणा केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीतील १४ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर...महात्मा फुले जनआरोग्य योजना आता पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारकांसाठीच लागू राहणार नाही तर राज्यातील सर्व साडे बारा कोटी लोकांना मिळणार आहे. राज्यातील कोणीही आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाही, यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे शिंदे म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर शिंदे यांनी याची माहिती दिली. महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत आतापर्यंत जनतेला दीड लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जात होता. त्याची मर्यादा पाच लाखांवर करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात दोन कोटी कार्ड वाटली जाणार आहेत, असे शिंदे म्हणाले.
याचबरोबर राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्यात 700 ठिकाणी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत. यासाठी 210 कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यभरात ९ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.