नवी दिल्ली/मुंबई - गेल्या एक-दीड महिन्यांपासून माध्यमांसमोर शिंदे गटाची बाजू भक्कमपणे मांडणारे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी गेल्या काही दिवसांत केलेल्या काही विधानांमुळे भाजपाची अडचण झाली होती, तसेच शिंदे गटाचीही गोची होत आहे. सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणात भाजपा नेते नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न केला होता, असं विधान करून दीपक केसरकर यांनी शिंदेगट आणि भाजपामध्ये वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर राणेंच्या पुत्रांनी दीपक केसरकर यांच्यावर बोचरी टीका केली होती. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून मोठं आणि स्पष्ट विधान केलं आहे.
नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा शिंदे यांनी केसरकरांचा विषय थोडक्यात उत्तर देत टोलवला. ते म्हणाले. तो विषय संपला आहे. याबाबत दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आता तो विषय संपला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून आमदारांनी बंड केल्याने उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या पाठिंब्याने राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शिवसेनेतील अनेक लहान मोठे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत त्यांच्या शिंदे गटात दाखल झाले. या शिंदेगटाचं प्रवक्तेपद कोकणातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्याकडे सोपवण्यात आले होते. केसरकरांनीही शिंदे गटाची बाजू संयमी पण तितक्याच भक्कमपणे मांडली होती. मात्र केसरकरांनी उद्धव ठाकरेंबाबत घेतलेली भूमिका तसेच भाजपा नेते नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांबाबत केलेल्या विधानांमुळे शिंदे गट आणि भाजपाची गोची झाली होती.