शिंदे गटात फूट पडावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवलेत. देवीने कुणाचा बळी घेतला? आता देखील काहीही बडबडत आहेत. माझ्या सोबत आलेला एकही आमदार पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणत आहेत. मी म्हणतो, यातील एकही पराभूत होणार नाही. एकजरी पराभूत झाला तरी हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून जाईल, असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना दिले आहे.
माझे भाषण पंतप्रधानांनी पूर्ण पाहिले. मी मनापासून बोलत होतो, म्हणून पाहिल्याचे ते म्हणाले. मी किती काळ आहे हे ठरवणारे तुम्ही कोण? याची चिंता जनता करेल. कोर्टाने पळवून लावलेय. जिंकलो आम्ही आणि फटाके ते वाजवत आहेत, हसावं की रडावं हेच कळत नाहीय, असा टोला शिंदे यांनी लगावला.
तुमच्या मतदारसंघात एकही काम शिल्लक राहणार नाही. थोडीफार कामं शिल्लक ठेवा, नाहीतर लोकं नंतर विसरतील. मुख्यमंत्रिपदासाठी मी गेलोच नव्हतो. खूप लोकांनी सांगितलं असे करा, तसे करा, मात्र आम्ही सावध राहिलो. आजचा मतदार खूप हुशार आहे. मी त्यांना एकदा नाही तर पाचवेळा समजावले होते. मग शिवसेनेला वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. माझ्याकडे अधिकार नव्हते, पण मी शिवसेनेच्या लोकांना वेळ द्यायचो, ऐकून घ्यायचो. थोडा निधी द्यायला लागलो, तर ते देखील या लोकांना पहावले नाही, असेही शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदेवर शंभरपेक्षा जास्त केसेस आहेत. वयाच्या एकवीसाव्या वर्षी मी चाळीस दिवस जेलमध्ये होतो. आमच्या बापांची नावं घेतली. माझ्या मुलांकडेही वेळ देता आला नाही. माझ्या परिवाराने मला साथ दिली. प्रत्येक क्षण शिवसेनेसाठी दिला म्हणून शिवसेना मोठी झाली. याच लोकांना बाळासाहेबांना मोठं केलं आणि याच लोकांनी बाळासाहेबांची शिवसेना मोठी केली. मला कोणताही फोडाफोडी करायची नाहीय. पण मी असाच बसणार नाहीय. माझ्याकडे अनेक पर्याय आहेत. माझ्याकडे असे अनेक कलाकार आहेत, त्यांची कलाकारी तुम्हाला कळणारही नाही, असा थेट इशारा एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला दिला आहे.