विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून दिल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री पदावरून वाटाघाटी सुरु आहेत. अशातच सातारा जिल्ह्याचे सुपूत्र एकनाथ शिंदे यांनाही मुख्यमंत्री पद हवे आहे. तर भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनाही मुख्यमंत्री पद हवे आहे. यावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असताना शिंदे, फडणवीस व अजित पवार गुरुवारी दिल्लीला चर्चेसाठी गेले होते. तिथून परतताच एकनाथ शिंदेंनीमहायुतीच्या चर्चेच्या सर्व बैठका रद्द करून साताऱ्यातील मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार शिंदे दरेमध्ये पोहोचले असून त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आणि काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जेव्हा राज्यात काही अडचणीची स्थिती निर्माण होते. याशिवाय राजकीय उलटफेर सुरु असतात. त्यावेळी या भाऊगर्दीतून एकनाथ शिंदे साताऱ्यातील आपल्या दरे या गावी दाखल होतात. त्यांना येथे शांतता आणि समाधान मिळते. शिवाय शेताकडे आल्यानंतर वेगळी ऊर्जा मिळत असते. त्यामुळे ते याठिकाणी येथे पसंत करतात. आत्तापर्यंत साधारणत: सहा ते सात वेळा अडचणीच्या काळात गावाकडे आले आहेत. याप्रमाणे शिंदे आजही गावी आले आहेत.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सध्या चर्चा सुरूच आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी दिल्लीत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक झाल्यानंतर शनिवारी मुंबईतही बैठक होती. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे, ता. महाबळेश्वर गावी दोन दिवसांच्या मुक्कामी आल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. दरे गावात दाखल झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी न बोलता शिंदे थेट घरी गेले. यामुळे शिंदे यांच्या मनात चाललंय तरी काय याची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, शिंदेंनी यापूर्वीही असाच गाव गाठला होता. राज्यात गतनिवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळून देखील शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत होते. पण, उद्धव ठाकरे स्वत:च मुख्यमंत्री झाल्याने नाराज झालेले एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामी दाखल झाले होते.
अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्येही मध्यंतरी धूसफूस सुरु झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाकडे येऊन मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. याचबरोबर ठाणे येथील हॉस्पिटलमधील घटना घडली त्यावेळीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरे मुक्कामीच होते. त्याच ठिकाणाहून त्यांनी सर्व परिस्थिती हाताळली होती. त्यानंतर ते ठाण्याकडे रवाना झाले होते.