राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर राज्यपालांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याचे आदेश पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. यामुळे राज्यपाल आता अॅक्शनमध्ये आल्याची चर्चा सुरु झाली आहे.
आठवडाभरापासून महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे. सत्ताधारी शिवसेनेचे बहुतांश आमदार आधी सूरत नंतर गुवाहाटीला गेले आहेत. बंडखोरी केल्याने आणि शिवसेना हायजॅक करण्याच्या प्रयत्नात असल्याचे आरोप या आमदारांवर होत आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपण सारे शिवसेनेतच असल्याचे आणि राहणार असल्याचे वारंवार सांगितले आहे. परंतू राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
या साऱ्या घडामोडींवर राज्य सरकारने आमदारांच्या घरासमोरील पोलीस संरक्षण काढून घेतल्याचा आरोप शिंदे यांनी शनिवारी केला होता. यावर आज अनेक आमदारांच्या कुटुंबाला केंद्राने सुरक्षा पुरविल्याचेही सांगितले जात आहे. असे असताना आता राज्यपालांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्तांना या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश दिले आहेत.
१५ बंडखोर आमदारांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरविली आहे. शनिवारी सकाळीच शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना ३७ आमदारांच्या सहीचे पत्र पाठविले होते. यामध्ये आमच्या कुटुंबीयांचे संरक्षण काढून घेतल्याचा आरोप केला होता.