एकनाथ शिंदेंना चार दिवसांत दुसरा धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळले, अजित पवारांना घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:41 IST2025-02-10T16:28:25+5:302025-02-10T16:41:09+5:30
काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलविलेल्या बैठकांना दांडी मारली होती, शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत. अशातच महायुतीत काहीतरी सुरु असल्याच्या घडामोडींवर चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपविली होती.

एकनाथ शिंदेंना चार दिवसांत दुसरा धक्का; आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळले, अजित पवारांना घेतले
महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची वृत्ते येत आहेत. आपल्या नेतृत्वात राज्यात पुन्हा सत्ता आली, यामुळे काही काळ मुख्यमंत्री पदी राहुद्या, असे म्हणणारे शिंदे हळूहळू देवेंद्र फ़डणवीसांपासून लांब जाऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी शिंदेंनी फडणवीसांनी बोलविलेल्या बैठकांना दांडी मारली होती, शिंदे वारंवार गावी जाऊन बसत आहेत. अशातच महायुतीत काहीतरी सुरु असल्याच्या घडामोडींवर चार दिवसांपूर्वी फडणवीसांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा प्रशासनातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याकडे सोपविली होती. हा शिंदेंना धक्का असल्याचे मानले जात असतानाच आता आणखी एक धक्का शिंदे गटाला देण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी आपत्ती व्यवस्थापनाची सगळी सुत्रे आपल्याकडे घेतली असून या समितीत अजित पवारांची वर्णी लागली आहे. महसूल,मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत. मात्र नगरविकासचे मंत्री शिंदे नाहीत, यामुळे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.
अशातच लाडक्या बहीण योजनेमुळे सत्तेत आलेल्या महायुती सरकारने आता लाडक्या बहीणांच्या यादीवरच कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात पाच लाख लाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहे.
राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडू लागला आहे. यामुळे 'आनंदाचा शिधा', 'शिवभोजन थाळी' आणि तीर्थदर्शन योजना या बंद करण्याच्या निर्णयापर्यंत सरकार आले आहे. यापैकी दोन योजना या शिंदेंच्या महत्वाकांक्षी योजना होत्या. एकीकडे या योजना बंद होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असताना या योजना बंद होणार नसल्याचा दावा शिंदेंचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. या योजनांचा खूपच कमी खर्च आहे, यामुळे याचा परिणाम आर्थिक गोष्टींवर होईल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले. तसेच आपत्ती व्यवस्थापनच्या बैठकीत काय झाले हे माहिती नसल्याचेही ते म्हणाले.