जळगाव – राजकीय वर्तुळात अनेक नेते कुणाला तरी गुरू मानत असतात. देवधर्मावर अनेकांचा विश्वास असतो. निवडणुकीच्या काळात तर जिंकून येण्यासाठी देवांकडे साकडं घातलं जातं. पूजा-अर्चा केली जाते. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. अलीकडेच शिंदे यांनी पाचोरा येथे दौरा केला. परंतु हा दौरा काही राजकीय नव्हता. त्यामुळे या दौऱ्याची प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती.
एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मंगळवारी पाचोरा येथे धावती आणि गोपनीय भेट दिली. या भेटीत जोशी नावाच्या एका ज्योतिषाकडे शिंदे गेले होते. या ज्योतिषाकडे एकनाथ शिंदे यांनी पूजा केल्याची चर्चा दबक्या आवाजात सगळीकडे सुरू आहे. या गोपीनय दौऱ्यामागे नेमकं काय कारण आहे? ही पूजा नेमकी कसली केली? असे विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मंगळवारी सकाळी ११ वाजता जळगाव विमानतळावर हेलिकॉप्टरनं आगमन झाले. यानंतर ते सरळ पाचोरा येथे पोहोचले.
या भेटीची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. एकनाथ शिंदे येणार याची माहिती फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील व पाचोरा येथील शिवसेना आमदार किशोर पाटील यांनाच देण्यात आली होती. पाचोरा येथे पोहोचल्यावर एकनाथ शिंदे ज्योतिषाकडे गेले. तिथे पूजा विधी झाला. यावेळी एका खोलीत फक्त एकनाथ शिंदे व ज्योतिषीच उपस्थित होते. पूजा आटोपून दोन तासानंतर ते जळगावला आले. तिथून मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पूजेने शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.
काही महिन्यापूर्वी पालघरच्या विक्रमगड तालुक्यात एका घरात तांदळामध्ये एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अघोरी पूजा करण्यात आली होती. शिंदे यांच्या जीविताला धोका निर्माण व्हावा. शरीराला जखमा होऊन दुखापत व्हावी या उद्देशाने ही पूजा करण्यात येत होती. यात एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती, हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू आणि सफेद कोंबडा यांचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात २ जणांना अटकही केली होती.