राज्यातील सत्तासंघर्षाचा दुसरा अंक सुरु होऊन काही महिने उलटले आहेत. आता पहिल्या अंकावरील सुनावणीला विधानसभा अध्यक्षांनी आजपासून सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोघांचीही बाजू मांडण्यासाठी वकिलांची फौज विधानसभेत दाखल झाली आहे. यावर आता दोन्ही बाजुच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.
आज सुनावणी होईल. आमचे वकील आमची बाजू मांडतील. आम्ही अध्यक्षांना सांगू की आजच्या दिवसातच ही हेअरिंग संपवा आणि निर्णय द्या. महाराष्ट्रात सर्वांना या निर्णयाची उत्सुकता आहे तर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांनी केली आहे.
ठराविक वेळेत व्हायला हवी होती ती सुनावणी आता होत आहे. सुप्रिम कोर्टाने जे निर्णय दिला आहे त्याचा सन्मान राखून निर्णय घ्यावा. सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर कोणती संस्था वेगळा निर्णय घेत नाही. भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे, सुनील प्रभू प्रतोद आहेत. यामुळे आम्हाला दिलेली नोटीस ही चुकीची आहे असं माझे मत आहे. स्वायत्त संस्था कोणता निर्णय घेणार हे सत्ताधारी सांगतात यावरून स्वायत्त संस्था कोणत्या परिस्थितीत आहेत हे लक्षात घ्या, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.
तर शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला विश्वास आहे अध्यक्षांचा निकाल शिंदेंच्या आमदारांच्या बाजूने येईल. विरोधक विरोधकांचे काम करत आहेत - शिवसेना पक्ष आमच्याकडे आहे. चिन्ह आमच्याकडे आहे. अध्यक्षांमार्फत येणारा निर्णय आधी येऊद्या. त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये जातील किंवा हायकोर्टमध्ये जातील हा विरोधकांचा विषय आहे, असे कदम म्हणाले.
आमचे वकील आमची बाजू मांडण्यासाठी देखील तयार आहेत. जे घटनेमध्ये लिहिले आहे ते घटनेच्या बाहेर कोणी जाऊ शकत नाही. आम्हाला नाही वाटत आमच्यावर कारवाई होईल याची आम्हाला खात्री आहे, असे प्रकाश सुर्वे यांनी म्हटले आहे.
आज अध्यक्षांसमोर शिवसेनेचे आमदार पात्र की अपात्र, शिवसेना पक्ष चिन्ह कोणाचं ह्यावर सुनावणी होणार आहे. आम्हाला खात्री आहे की आमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही. अध्यक्ष देतील तो निकाल आमच्या बाजूनेच लागण्याची शक्यता दाट आहे. कोण जिंकेल कोण हरेल या निकालावर सर्व जनतेचे लक्ष आहे. आज निकालात दूध का दूध पानी का पानी होईलच, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.