राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवारी डी.वाय. पाटील विद्यापीठाने डी. लिट ही पदवी देऊन सन्मानित केलं. हा पदवी वितरण सोहळा नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये संपन्न झाला. ही पदवी स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी चौफेर टोलेबाजी केली.
एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण पूर्ण करू शकलो नव्हतो. मात्र मनामध्ये खंत आणि जिद्द होती. तीन वर्षांपूर्वी मी मेहनत घेऊन बीएची पदवी घेतली. त्यावेळी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झालो. आता आणखी पुढे शिकायचं आहे. मधली काही ऑपरेशन झाली. त्यात शिक्षण राहून गेलं.
त्यांनी पुढे सांगितलं की, तसा मी यापूर्वीच डॉक्टर झालोय. काही छोटीमोठी ऑपरेशन्स करत असतो. एवढी वर्षे समाजामध्ये वावरत आहे. जगाच्या विद्यापीठामधून खूप शिकलो आहे. मात्र विनम्रता माझ्यासाठी महत्त्वाची आहे, असंही त्यांनी नमूद केलं. तसेच मुलगा श्रीकांत शिंदे यानेही डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेमधूनच एमबीबीएस आणि एमएस पदव्युत्तर शिक्षण घेतलं ही आठवणही एकनाथ शिंदे यांनी सांगितली.
दरम्यान, या पदवीबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या वतीने सामाजिक, वैद्यकीय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मी आजवर केलेल्या कार्याची दखल घेऊन मला (डी.लिट) ही मानाची पदवी देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले. ही पदवी मिळाल्याचे समाधान वाटत असले तरीही कोणती पदवी मिळावी यासाठी मी कधीही काम केले नाही. उलट मी माझी जबाबदारी मानून आजवर काम करत आलो आणि यापुढे देखील एक सर्वसामान्य कार्यकर्ता बनून कार्यरत रहाणार आहे, असे त्यांनी सांगितले.