लोणावळा : लोणावळ्याजवळील आई एकवीरेच्या कार्ला गडावर लेणीच्या डोंगरावरून गुरुवारी रात्री पुन्हा काही सुटे झालेले दगड कार्यालयाच्या शेजारी पडले. त्यामुळे गडावरील दरडी पडण्याचा धोका वाढला आहे. पुरातत्त्व विभाग वन विभाग व तालुका प्रशासनाने तातडीने याची दखल घेत उपाययोजना करण्याची मागणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. मागील शनिवारी रात्रीदेखील गडावर काही दगड पडले आहेत. सुदैवाने दोन्ही वेळेस दगड रात्रीच्या वेळी पडल्याने दुर्घटना घडली नाही.भारतीय पुरातत्त्व विभाग, वन विभाग व मावळ तालुका प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने या घटनांची गंभीर दखल घेऊन सुरक्षा उपाययोजना करावी. देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक कार्ला गडावर येत असतात. शनिवार व रविवार या सुटीच्या दिवशी पर्यटक, तसेच मंगळवार, शुक्रवार या देवीच्या वारी गडावर भाविकांची विशेष गर्दी असते. दिवसा जर डोंगरावरून धोकादायक दगड खाली आले, तर मात्र मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मंदिराशेजारी मागील वर्षी दरडी पडल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या वतीने लोखंडी जाळ्यांचे छत तयार करण्यात आले असल्याने मंदिर परिसरात जरी दगड पडणार नसले, तरी डोंगराच्या इतर भागातून सुटे झालेले दगड पडत असल्याने धोका वाढला आहे. गडाला सुरक्षा जाळ्या हव्यातगडावर आजवर कसलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. मागील वर्षी गडावर मोठ्या प्रमाणात दरडी पडल्या होत्या, त्या घटनांची आता पुनरावृत्ती होऊ लागली आहे. मागील वर्षभरापासून पुरातत्त्व विभाग व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनदेखील या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेली नाही. ते स्वत:देखील काही करत नाही व आम्ही काही करू लागलो, की आमच्यावर गुन्हे दाखल करतात. गडावर वारंवार दगडी पडण्याचे प्रकार ध्यानात घेता गडावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने डोंगराला सुरक्षा जाळी लावावी, अशी मागणी श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी केली आहे.(वार्ताहर)
एकवीरा गडावरील पडले दगड
By admin | Published: July 02, 2016 2:01 AM