राज्यात विधानसभा निवडणुकीचा आखाडा सुरू आहे. नेतेमंडळी प्रचारसभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच आता, भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. कुठलं बी टाकलं होतं? असं विचारत, "बारामतीची मोठी ताई सुप्रिया सुळे, रोज उठतात आणि खोटं बोलतात. परवा म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली आहे. तिजोरीत एक रुपया नाहीये आणि दोन दिवसांपूर्वी या खोट्यांचे सरदार राहुल गांधी म्हणले, 'महाराष्ट्रातल्या बहिणींना तीन हजार रुपये देणार'. यांच्यावर विश्वास ठेवू नका. अहो हे ज्या ज्या ठिकाणी दिलेत त्या बायकांना विचारा. दोन महिने दिले, नंतर दिलेच नाही," असे वाघ यांनी म्हटले आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, "आता मी तुम्हाला सांगितलं, सावत्र भावांसारख्या सावत्र बहिणीही असतात. तशी अजून एक सावत्र बहिण आहे आपली, बारामतीची मोठी ताई सुप्रिया सुळे. रोज उठतात आणि खोटं बोलतात. मला तर आश्चर्य वाटतं. अरे, खोटं बोललं तर लक्षात ठेवायला लागतं, लागतं की नाही? आपल्याला आहे ना अनुभव? नवऱ्याकडून घेतो ना पैसे कारण सांगून? याचे पैसे भरायचे आणि चार दिवसांनी परत तेच कारण सांगतो. तो म्हणतो, "अरे परवाच तर घेतले ना पैसे तू. खोटं बोलता".
चित्रा वाघ म्हणाल्या, "परवा म्हणाल्या (सुप्रिया सुळे) की, महाराष्ट्र सरकारची तिजोरी खाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत एक रुपया नाहीये, असं परवा म्हणाल्या आणि दोन दिवसांपूर्वी या खोट्यांचे सरदार राहुल गांधी आले होते आणि ते म्हणले, 'महाराष्ट्रातल्या बहिणींना मी आता तीन हजार रुपये देणार आहे.' ऐका पुढं. मला आश्चर्यपण वाटलं आणि मला प्रश्नपण पडला की, एका ठिकाणी बारामतीची ताई सांगते की, तिजोरी खाली आहे आणि यांचा सरदार सांगतो तीन हजार रुपये देणार. तर कुठून देणार तीन हजार रुपये?"
"मग मला आठवलं, मी आता येताना जयश्रीला म्हटलं, "जयश्री, तीन हजार रुपये कुठून देणार?" मग आम्हाला आठवलं की ताईंनी लिहून दिलंय की, त्यांच्या दहा एकराच्या शेतात 100 कोटीची वांगी पिकतात. पिकतात का ग? यावर महिलांमधून आवाज आला 'नाही...'. यावर चित्रा वाघ यांनी पुन्हा प्रश्न केला, 10 एकरा 100 कोटीची वांगी पिकतात का? सांगा तुमच्याकडे तर वांगी प्रसिद्ध आहेत, पिकतात का? पुन्हा महिलांमधून आवाज आला, 'नाही...'. पुन्हा चित्रा वाघ म्हणाल्या, नक्की नाही..., बघा बरं... नाही तर परत माझ्या नावाने बोंबलेल."
वाघ पुढे म्हणाल्या, "ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न सुप्रिया सुळे, महाविकास आघाडीच्या नेत्या, कुठलं बी टाकलं होतं? जरा आमच्या यावलच्या ताईंनापण द्या. पाठवा की जरा इकडे. म्हणजे काय होईल की, माझी यावलची ताई सुद्धा 100 कोटीची वांगी पिकवीन! असे हे खोटारडे लोक आहेत, हे मी तुम्हाला सांगायला आली आहे. यांच्यावर विश्वास ठेवू नका."
"अहो खटाखट खटाखट नाही. हे ज्या ज्या ठिकाणी दिलेत त्या बायकांना विचारा. दोन महिने दिले, नंतर दिलेच नाही. बऱ्याच जणींना सांगितलं, "तुमचं केवायसीच नाही". अशा पद्धतीने महिलांना फसवलंय, मातृशक्तीला फसवलंय," असा टोलाही चित्रा वाघ यांनी विरोधकांना लगावला.