ऑनलाइऩ लोकमत
पणजी, दि. 11 - गोवा विधानसभा निवडणुकीत पहिल्या धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव झाला आहे. त्यांनी मांद्रे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा साडेतीन हजार मतांनी पराभव झाला आहे. निकाल हाती येण्याआधी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मंदिरात जाऊन देवदर्शन घेतलं होत. देवाची इच्छा असेल तर पुन्हा नक्कीच मुख्यमंत्री होईन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
गोव्याचा निकालही भाजपाच्या विरोधात जाईल अस चित्र आहे. एक्झिट पोलचा अंदाज बहुतांश चुकणार अस दिसतयं. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेमध्ये बहुमतासाठी 21 जागा आवश्यक आहेत. सध्या गोव्यामध्ये काँग्रेस 6, अन्य 5 आणि भाजपाला 3 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया टीवी सी वोटरच्या अंदाजानुसार गोव्यामध्ये भाजपाला 15 ते 21, काँग्रेसला 12 ते 18 आणि आम आदमी पक्षाला 4 जागा मिळतील असा अंदाज होता.
गोव्यात एकूण 40 जागा आहेत. सध्याच्या गोवा विधानसभेत भाजपा 21, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष 3, काँग्रेस 9, गोवा विकास पार्टी 2 आणि अपक्ष 5 असे पक्षीय बलाबल आहे.