मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या आठ जागांसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे. निकाल ३० डिसेंबरला जाहीर होईल.या आठ जागांपैकी भाजपाकडे एकही जागा नाही. ४ जागा काँगे्रस, २ शिवसेनेकडे, १ राष्ट्रवादीकडे तर १ राष्ट्रवादी समर्थक अपक्षाकडे आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम, नागपूर, अहमदनगर, मुंबई-२, धुळे-नंदुरबार, कोल्हापूर आणि सोलापूर या त्या आठ जागा आहेत. गोपीकिसन बाजोरिया ( अकोला-बुलडाणा-वाशिम - शिवसेना), राजेंद्र मुळक (नागपूर-काँग्रेस), रामदास कदम ( मुंबई- शिवसेना), भाई जगताप (मुंबई-काँग्रेस), अमरिश पटेल (धुळे-नंदुरबार-काँग्रेस), महादेवराव महाडिक (कोल्हापूर-काँग्रेस), दीपक साळुंखे (सोलापूर-राष्ट्रवादी), अरुणकाका जगताप (अहमदनगर-अपक्ष) हे विद्यमान आमदार आहेत. वर्षभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आठ मतदारसंघांमधील निवडणुकीत भाजपाला किती जागा मिळतात, हा औत्सुक्याचा विषय असेल. काँग्रेससमोर त्यांच्या चार जागा वाचविण्याचे आव्हान असेल. ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याची घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादीने आधीच केली आहे. या निवडणुकीत घोडेबाजार होतो, ही बाब लपून राहिलेली नाही. २७ डिसेंबरच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची सुरुवात २ डिसेंबरला होईल. १० डिसेंबरला अर्जांची छाननी होईल. १२ डिसेंबरला अर्ज मागे घेण्याचा दिवस असेल. (विशेष प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या ८ जागांसाठी निवडणूक
By admin | Published: November 25, 2015 3:24 AM