निवडणूक आयोगाने देशभरातील तीन लोकसभा मतदारसंघ आणि विविध राज्यांतील 30 विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एका मतदार संघाचा समावेश आहे. ही निवडणूक 30 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. (By-elections 30 Assembly constituencies of various States to be held on 30th October including Deglur: Election Commission)
दादरा नगर हवेली आणि दीव दमन, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशमधील तीन लोकसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. याचबरोबर विविध राज्यांतील 30 विधानसभा मतदार संघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदार संघाचा समावेश आहे.(Deglur By-election will be held on 30 October.)
कोरोनामुळे काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या देगलूर मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. सध्या काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर शिवसेनेच्या माजी आमदाराने दावा ठोकला आहे. तसेच शिवसेनेने तिकीट न दिल्यास भाजपात प्रवेश करू अशा इशारा दिला आहे. देगलूरच्या रिक्त जागेवर अंतापुरकर यांच्या पुत्राला उमेदवारी देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. शिवसेनेच्या माजी आमदारांनी दंड थोपटून मैदानात उतरण्याची घोषणा केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. सुभाष साबणे हे याआधी दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. मात्र मागच्या निवडणुकीत त्यांना अंतापूरकर यांनी पराभूत केले होते. पंढरपूर पोटनिवडणुकीसारखाच फटका इथे बसू नये यासाठी महाविकास आघाडीला मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.