पुणे : महापालिका निवडणुकीच्या चार सदस्यांचा एक प्रभाग या रचनेस निवडणूक आयोगाने शुक्रवारी मंजुरी दिली. आता ७ आॅक्टोबरला प्रभागांची आरक्षण सोडत काढली जाणार असून त्यानंतर १० आॅक्टोबरला संपूर्ण प्रभागरचना नागरिकांसाठी जाहीर केली जाईल. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी २५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत आहे. त्यानंतर राजकीय हालचालींना वेग येईल.प्रभागरचना हा राजकीयदृष्ट्या सध्याचा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून ही रचना होत असताना त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत होत्या. काँग्रेसने तर थेट निवणडणूक आयोगाकडेच तशी तक्रार केली होती. दरम्यान, निवडणूक शाखेने आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचा अवलंब करीत ही रचना पूर्ण केली व विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव व महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या त्रिसदस्यीय समितीला ७ सप्टेंबरला सादर केली. या रचनेत त्रिसदस्यीय समितीने काही प्रभागांमध्ये फेरफार केला असल्याची चर्चा त्यानंतर सुरू झाली. काही जणांसाठी सोयीचे प्रभाग केले असल्याचे बोलले जात होते.त्यानंतर १० आॅक्टोबरला प्रभागरचना नागरिकांसाठी जाहीर केली जाईल. त्यावर २५ आॅक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राजकीय कार्यकर्त्यांकडून या रचनेवर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. त्यांच्या सुनावणीनंतरच ही प्रभागरचना अंतिम होऊन आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. (प्रतिनिधी) >प्रारूप आराखड्यात कसलाही बदल नाहीया प्रारूप रचनेला आयोगाने येत्या २५ सप्टेंबरपर्यंत मंजुरी देणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच आयोगाने प्रभागरचनेला अंतिम मंजुरी दिली आहे. शुक्रवारी यासंबंधीचे पत्र आयोगाकडून महापालिकेला आले असल्याची माहिती आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. महापालिकेने दिलेल्या प्रारूप आराखड्यात कसलाही बदल न करता ही मंजुरी मिळाली असल्याचे समजते. आता प्रभागांची रचना निश्चित झाली आहे, मात्र त्यावर हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया अद्याप व्हायची आहे. तत्पूर्वी ७ आॅक्टोबरला प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात येईल.
प्रभागरचनेस निवडणूक आयोगाची मंजुरी
By admin | Published: September 24, 2016 1:03 AM