Election Commission of India : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सर्वाधिक फटका हा महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला असून त्यांच्या १०१ पैकी केवळ १६ जागा निवडून आल्या आहेत. मतांच्या टक्केवारीवरुन नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारामुळे आयोगाच्या निष्पक्ष व पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकल्याचा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने नाना पटोलेंच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
"महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीतील तफावत गंभीर व चिंताजनक प्रकार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजता ५८.२२ टक्के मतदान झाले, त्याच रात्री ११.३० वाजता ते ६५.०२ टक्के तर दुसऱ्या दिवशी २१ नोव्हेंबर रोजी हेच मतदान ६६.०५ टक्के झाल्याचे सांगितले, यात एकूण ७.८३ टक्के वाढ झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. तब्बल ७६ लाख मतांची ही वाढ असून मतदानाचा टक्का कसा वाढला? निवडणूक आयोगाने जिथे मतदान वाढले त्या केंद्राचे व्हिडीओ फुटेज जाहीर करावे. निवडणूक आयोगाने जनतेच्या मतांवर दरोडा टाकला आहे," असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
"मतदानाच्या दिवशी ५ वाजल्यानंतर मतांची टक्केवारी वाढल्याचे प्रमाण पाहता मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असल्या पाहिजेत. राज्यातील किती मतदार संघावर अशा रांगा लागल्या होत्या ते निवडणूक आयोगाने पुराव्यासह दाखवावे. निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावले होते, त्याचे चित्रिकरण दाखवावे. मतदान झाल्यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन माहिती देत असते. यावेळी आयागाने पत्रकार परिषद का घेतली नाही. वाढीव मतांबद्दल देशभरातील विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी शंका उपस्थित केल्या आहेत. यामुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून राजकीय पक्ष, उमेदवार वा इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे," असंही नाना पटोले म्हणाले.
"काँग्रेस पक्षाचा पराभव झाला म्हणून नाही तर लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष मतदानाच्या टक्केवारीतील तफावतीचा मुद्दा लावून धरत आहे. भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने संगनमताने लोकशाहीची क्रूर थट्टा केली आहे. विधानसभा निवडणुकीतील मतांच्या तफावतीसंदर्भात काँग्रेस पक्ष न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई लढेल," असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.
निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
नाना पटोलेंनी पत्रकार परिषदेत आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने याबाबत एक्स पोस्टवरुन स्पष्टीकरण दिलं आहे. "२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, संध्याकाळी ५ वाजता मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के (अंदाजे) होती आणि अंतिम मतदानाची टक्केवारी ६६.०५ टक्के होती. हे सामान्य आहे कारण संध्याकाळी ६ नंतर रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या व्यक्तीने मतदान करेपर्यंत मतदान चालूच असते. २०१९ मध्येही, टक्केवारी संध्याकाळी ५ वाजता ५४.४३ टक्के (अंदाजे) आणि अंतिम वेळी ६१.१० टक्के होती. महाराष्ट्रातील शहरी आणि निमशहरी भागात मोठ्या संख्येने मतदार संध्याकाळी येतात," असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.
"हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत दोन तासांच्या मतदानाची माहिती केवळ तोंडी फोनवरच्या संवादावर आधारित असते. दुसरीकडे, फॉर्म-१७ सी जो पोलिंग एजंटना पोल बंद करताना दिला जातो तो अंतिम टक्केवारी आणि मतांची मोजणी यांच्याशी जुळतो. झारखंडमध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तर महाराष्ट्रात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान झालं आहे. झारखंडमध्ये, बहुतेक मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजता मतदान संपले होते. महाराष्ट्रात अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी ६ वाजता मतदार रांगेत उभे होते. झारखंडमध्ये तीस हजारांहून कमी मतदान केंद्रे आहेत. महाराष्ट्रात एक लाखाहून अधिक मतदान केंद्रे आहेत," असंही निवडणूक आयोगाने म्हटलं.