नवी दिल्ली : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंबंधी सर्व प्रक्रिया पारदर्शक होत्या, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. याबाबत काँग्रेसने नोंदवलेल्या सर्व वैध तक्रारींचा योग्य आढावा घेतला जाईल, असे आश्वासनही आयोगाने काँग्रेसला दिले. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक गैरप्रकार झाले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावर आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधींना ३ डिसेंबर रोजी सर्व तक्रारींवर चर्चा बोलवले आहे.
या निवडणुकीतील प्रक्रियांसह आकडेवारीवर आक्षेप नोंदवून काँग्रेसने ही आकडेवारी विसंगत असल्याचे म्हटले होते. याबाबत निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदवण्यात आले होते. याबाबत पुरावे सादर करण्यासाठी समोरासमोर सुनावणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. यावर निवडणूक आयोगाने या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता होती, असे ठासून सांगितले. या प्रत्येक टप्प्यात उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचा सहभाग होता, असे आयोगाने नमुद केले.
आयोगाचे म्हणणे असे...
■ सर्व राजकीय पक्षांच्या सहभागाने मतदार याद्या अद्ययावत करण्याची एक पारदर्शक प्रक्रिया झाली होती.
■ मतदानाच्या आकडेवारीत कोणत्याही प्रकारचे घोळ नाहीत. सर्व उमेदवारांची प्रत्येक मतदान केंद्रांवरील आकडेवारी उपलब्ध असून त्याची पडताळणीही झाली आहे. अंतिम आकडेवारीत फरक दिसतो; कारण संबंधित पीठासीन अधिकारी ही आकडेवारी अंतिम करण्यापूर्वी अनेक कायदेशीर कर्तव्याचे पालन करुन प्रक्रिया पूर्ण करीत असतात.