अजित पवारांच्या बंडाचा आता दुसरा अंक सुरु झाला आहे. विधानसभेत राष्ट्रवादीचे दोन प्रदेशाध्यक्ष एकमेकांच्या गळ्यात गळे घालतानाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर शरद पवार गटातील आमदारांना अजित पवारांनी भरघोस निधी देखील दिल्याचे समोर आले होते. अशातच आता पुन्हा एकदा अजित पवार वि. शरद पवार असे राजकीय युद्ध सुरु होणार असल्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्षपद, बहुतांश आमदार, पदाधिकारी आदी लोक आमच्यासोबत असून राष्ट्रवादी पक्ष आम्हाला देण्यात यावा अशी याचिका अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. या बंडानंतर शरद पवार गटानेही तातडीने हालचाली करत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. आता त्यावर म्हणणे मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नोटीस पाठविल्याचे समजते आहे. एबीपी माझाने सुत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
अजित पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस आली आहे. आम्हीच मुळ पक्ष असा दावा अजित पवारांनी केला होता. यावर आयोगाने उत्तर मागविले आहे. आता शिवसेनेसारख्याच सर्व घडामोडी पुन्हा एकदा राज्यात घडणार आहेत.
राज ठाकरेंनी आजच राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सामिल झाला आहे, थोड्या दिवसांनी दुसरा गटही सत्तेत सहभागी होईल अशी टीका केली होती. दुसरीकडे सुनिल तटकरे आणि जयंत पाटील या दोन्ही गटाच्या प्रदेशाध्यक्षांचे गळाभेटीचे फोटो आले होते. तिसरीकडे अजित पवार गटाने सलग तीन दिवस शरद पवारांची भेट घेतली होती. या साऱ्या घडामोडींनंतर आता शरद पवार गटाला म्हणणे मांडण्यासाठी नोटीस आली आहे.