'मी बेकायदेशीर तर निवडून आलेले सर्व आमदार बेकायदेशीर'; जयंत पाटलांचे मोठे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 07:52 PM2023-10-06T19:52:49+5:302023-10-06T19:53:29+5:30
Election Commission on NCP : 'शरद पवारांच्या कार्यशैलीतून ही लोकं मोठी झाली, आता शरद पवारांना प्रश्न विचारत आहेत.'
Election Commission on NCP : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर पक्षावर दावा केला आहे. याप्रकरणी आज निवडणूक आयोगात सुनावणी झाली. सोमवारी चार वाजता पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून जयंत पाटलांची (Jayant Patil) नियुक्ती बेकायदेशीर होती, असा युक्तीवाद करण्यात आला. यावर आता स्वतः जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंह यांनी केला. तसेच सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, असा दावाही त्यांनी केला. यावर जयंत पाटील म्हणाले की, माझी नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांना माझ्या सहीनेच एबी फॉर्म देण्यात आले होती. जर मी बेकायदेशीर असेल, महाराष्ट्रातून सगळे निवडून आलेले आमदारदेखील बेकायदेशीर ठरवण्याचा काहीतरी डाव दिसतो.
संबंधित बातमी- अजित पवार गटाने मृत व्यक्तींची कागदपत्रे सादर केली; शरद पवार गटाचा आरोप
मी निवडणुकीने निवडून आलेलो आहे, मी निवडून आल्यानंतर प्रफुल पटेल यांनीच मला पत्र दिले होते. संख्याबळबाबत आमचे वकील युक्तिवाद करतील. पहिल्यांदा जेव्हा घटना झाली, तेव्हा या 24 लोकांनी शरद पवारांना पाठिंबा दिला होता. पण यानंतर अजित पवार गटाने कोणाला नियुक्ती दिली असेल आणि त्यांचे त्यांना समर्थन असेल, निवडणूक आयोगाने पूर्वी अध्यक्ष कोण होते हे विचारात घेऊन निर्णय द्यावा, असं जयंत पाटील म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले, पंचवीस वर्षे तुम्ही शरद पवारांसोबत काम केले. पंचवीस वर्षानंतर तुम्हाला एखादी गोष्ट लक्षात आली असेल, तर त्याच्याबद्दल शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. इतक्या उशिरा का लक्षात आले? पक्षांतर्गत निवडणुका ज्यावेळी झाल्या, त्यावेळेस असा प्रश्न कोणी विचारला नाही. चिन्ह गोठवण्याचा प्रश्न येत नाही, कारण पक्ष आणि चिन्ह शरद पवार यांचा आहे. एखाद्याने उद्या भाजपच्या चिन्हबद्दल प्रश्न उपस्थित केला तर ते तुम्ही गोठावणार का?
शरद पवार संस्थापक आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली चालवलेल्या पक्षाला आतापर्यंत कोणीही चॅलेंज केलेले नाही. त्यांना सर्वांनी सर्वाधिकार दिलेले होते, हात उंचावून, त्याचे क्लिप सर्वांकडे आहेत. चिन्ह गोठवणे हे अन्यायकारक होईल. चिन्ह गोठण्याची एक पद्धत आहे, पण आमच्या वकिलांनी सांगितले की चिन्ह गोठवू नका. शरद पवार यांच्या कार्यशैलीतून हे लोक मोठी झाली आहे, तीच लोक आता शरद पवार यांना प्रश्न विचारत आहेत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.