नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ कमालीचा चर्चेत आला आहे. शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर यांना केवळ ४८ मतांनी विजय मिळाला आहे. या मतमोजणीत आधी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर विजयी घोषित करण्यात आले होते. यानंतर काही नाट्यमय घडामोडी घडल्या आणि वायकरांना विजयी घोषित करण्यात आले. आता या मतमोजणीवेळी ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल वायकरांच्या नातेवाईकाकडे होता, त्यावरून राजकीय वादळ उठले आहे. पोलिसांनी यावर गुन्हा दाखल करताच निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. आज या साऱ्या विषयावर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे.
पोलिसांनी वायकरांचा मेहुणा मंगेश पंडीलकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याचबरोबर निवडणूक आयोगाचा कर्मचारी दिनेश गुरव याच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. मंगेश पंडीलकर हे मतमोजणीच्या खोलीत मोबाईल वापरत असल्याची तक्रार इतर उमेदवारांनी केली होते. त्यानंतर पोलिसांनी ४ जून रोजीच पोलिसांनी हा मोबाईल जप्त केला होता. आता पोलीस तपासात पंडीलकर हे ईव्हीएमशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेस्को सेंटरमध्ये वापरण्यात आलेले ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी तयार करण्यासाठी हा मोबाईल वापरला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एनडीए उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे," असे काँग्रेसने म्हटले होते. या साऱ्या वादावर निवडणूक आयोग आज दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यामध्ये आयोग काय स्पष्टीकरण देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जेव्हा मतमोजणीवेळी चुरस होती तेव्हा या फोनचा वापर सकाळपासून सायंकाळी साडे चार वाजे पर्यंत केला गेला असा पोलिसांना संशय आहे.
निवडणूक आयोगाकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज असून, ते आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. हे फुटेज पोलीस आजपासून तपासणार आहेत. या फोनमधील नंबरचा सीडीआरही तपासला जात आहे. या फोनवरून कोणाला कॉल गेले कोणाचे आले, किती ओटीपी प्राप्त झाले हे जाणून घ्यायचे आहे. नियमांनुसार, ओटीपी जनरेट झाल्यानंतर फोन आरओ (रिटर्निंग ऑफिसर) यांना द्यावा लागतो. आता फोन परत का घेतला नाही, याचा तपास सुरू आहे. सध्या पोलीस त्याचा तपास करत असून आता मोबाईलच्या फॉरेन्सिक रिपोर्टची प्रतीक्षा आहे.