BJP Devendra Fadnavis ( Marathi News ) : राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने काही वेळापूर्वी जाहीर केला. आयोगाच्या या निर्णयानंतर राज्याच्या राजकारणात प्रतक्रिया उमटत असून अजित पवार विरुद्ध शरद पवार गट आमने-सामने आले असताना भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीत समाविष्ट असणाऱ्या अजित पवार यांच्या पक्षाचं अभिनंदन केलं आहे.
अजित पवारांचं अभिनंदन करत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, "आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो."
निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर समाधान व्यक्त करत अजित पवार म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका पुढे वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटिबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू. निवडणूक आयोगाचा निकाल नम्रपणे स्वीकारत आहोत. या निकालाने आमच्या समोरची जबाबदारी आणखी वाढली आहे," असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
रोहित पवार भडकले!
निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह दुसऱ्या गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. "केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो.… परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं… असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते. आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे," असं रोहित पवार म्हणाले.