काँग्रेस- राष्ट्रवादीत सेटलमेंट : बसपा स्वतंत्र लढणार नागपूर : महापौर, उपमहापौर पदासाठी उद्या, शुक्रवारी निवडणूक होत आहे. भाजपने महापौरपदासाठी सत्तापक्ष नेते प्रवीण दटके व उपमहापौर पदासाठी अपक्षांचे गटनेते मुन्ना पोकुलवार यांचे अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी अर्ज भरले होते. मात्र, आता दोन्ही पक्षात सेटलमेंट झाले असून काँग्रेस महापौरपदाचा तर राष्ट्रवादी उपहापौरपदाचा उमेदवार रिंगणात उतरवेल. बसपा स्वतंत्रपणे लढणार आहे.राजे रघुजी भोसले नगरभवनात सकाळी १० वाजता निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. भाजपचे सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, काँग्रेसचे नगरसेवक अरुण डवरे व बसपाच्या हर्षला जयस्वाल यांच्यात महापौर पदासाठी लढत होईल. उपमहापौर पदासाठी सत्तापक्षाकडून मुन्ना पोकुलवार, काँग्रेसच्या सुजाता कोंबाडे, राष्ट्रवादीचे राजू नागुलवार व बसपाच्या शबाना परवीन मो. जमाल यांनी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी दोघांनीही उपमहापौर पदासाठी अर्ज भरल्याने संबंध ताणले गेले होते. गुरुवारी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते विकास ठाकरे व राष्ट्रवादीच्या गटनेत्या प्रगती पाटील यांची चर्चा झाली. तीत कोंबाडे यांचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे नागुलवार हे उमेदवार राहतील, असे ठरले. संख्याबळाच्या आधारावर भाजपप्रणित नागपूर आघाडीच्या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. गेल्यावेळी महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने बसपाला समर्थन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर बसपा नेत्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसने न मागताच समर्थन दिल्याचा दावा केला होता. त्यामुळे या वेळी काँग्रेसने बसपाला समर्थन न देता स्वत:चा उमेदवार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे बसपाने आम्ही कुणाला मदत मागणार नाही, कुणी मदत करीत असेल तर स्वागत करू, अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)सत्तापक्ष नेते पदाचा निर्णय नाही सत्तापक्ष नेते प्रवीण दटके हे शुक्रवारच्या निवडणुकीनंतर महापौर होतील. त्यामुळे सत्तापक्ष नेतेपदी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी किंवा कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यापैकी एकाची निवड होण्याची शक्यता आहे. भाजपच्या संसदीय मंडळात यावर चर्चा झाली पण निर्णय गडकरी- फडणवीस घेतील, असे ठरले होते. भाजपच्या सूत्रानुसार गडकरी- फडणवीस यांची या विषयावर अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे शुक्रवारच्या सभेत सत्तापक्ष नेता निवडला जाण्याची शक्यता कमीच आहे.
महापौर, उपमहापौर पदाची आज निवडणूक
By admin | Published: September 05, 2014 1:07 AM