नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला होता. तसेच एकाही पक्षा विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणाऱ्या २८ जागांचा टप्पाही ओलांडता न आल्याने गेल्या तीन-चार महिन्यांपासून विरोधी पक्षनेत्याची निवड होऊ शकली नव्हती. दरम्यान, सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड निश्चित झाली असून, शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाची शिफारस पुढे करण्यात आली आहे.
आज मातोश्रीवर झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकीत विरोधी पक्षनेतेपदासाठी नेत्याची निवड करण्याचे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. तसेच त्यांच्या नावाची विधिमंडळाकडे शिफारस करण्याची घोषणा केली.
भास्कर जाधव हे शिवसेना ठाकरे गटामधील ज्येष्ठ आमदार असून, १९९९ मध्ये ते शिवसेनेकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच त्यांनी काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपदही सांभाळलं होतं. पुढे २०१९ मध्ये भास्कर जाधव हे पुन्हा शिवसेनेत परतले होते. तसेच २०१९ मध्ये शिवसेनेकडून आणि २०२४ मध्ये ठाकरे गटाकडून ते विधानसभेवर निडून आले आहेत.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळाले होते. तर विरोधी पक्षांच्या महायुतीमधील घटक पक्षांची दाणादाण उडाली होती. तसेच शिवसेना ठाकरे गटाला २०, काँग्रेसला १६ आणि शरद पवार गटाला केवळ १० जागांवर समाधान मानावे लागले होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या २८ जागांचा टप्पा एकाही पक्षाला ओलांडता आला नव्हता. महाविकास आघाडीमध्ये २० जागा जिंकून ठाकरे गट हा मोठा पक्ष ठरल्याने ठाकरे गटाने सुरुवातीपासूनच या पदावर दावा केला होता. अखेर ठाकरे गटाकडून या पदासाठी आपल्या पक्षातील ज्येष्ठ आमदाराची निवड करण्यात आली आहे.