राज्यात लोकसभेबरोबरच होणार विधानसभेचीही निवडणूक?; भाजपा करतंय सर्वेक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 10:07 AM2024-02-13T10:07:41+5:302024-02-13T10:08:13+5:30
अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर चर्चेला मिळाले अधिक बळ
मुंबई : लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार, अशी चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणि आणखी काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात असल्याने या चर्चेला बळ मिळाले आहे.
लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ पैकी किमान ४० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपप्रणीत महायुतीने समोर ठेवले आहे. अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे बडे नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेले तर अर्थातच मोठा फायदा होईल. चव्हाण यांच्यासोबत येत्या दोन-चार दिवसांमध्ये काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये जातील असे म्हटले जात आहे. त्या परिस्थितीत या आमदारांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल.
आणखी किती आमदार ?
चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदार राजीनामे देऊन काँग्रेसबाहेर पडतील. ही संख्या १४ पर्यंत असू शकते असे म्हटले जाते. त्यांनी आमदारकी सोडली तर विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्याकडे पद नसेल, निधी मिळणार नाही. असे असूनही काही आमदारांनी लगेच काँग्रेस सोडली तर लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्रच होण्याची शक्यता वाढेल.
सर्वेक्षण सुरू
सूत्रांनी सांगितले, की लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र घेतल्यास काय आणि वेगळी घेतल्यास काय चित्र असेल या बाबतची सर्वेक्षणे खासगी कंपन्यांकडून केली जात आहेत. याची चाचपणी भाजपश्रेष्ठींकडून केली जात आहे.
...तर खर्च वाढणार
महाविकास आघाडी सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या तर खर्चाचा आकडा वाढेल. दोन्हींचा खर्च करणे महायुतीच्या तुलनेने महाविकास आघाडीला कठीण जाईल. मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा लोकसभेबरोबरच विधानसभेसाठीही करून घ्यायचा, असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. त्याचवेळी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेची गणिते वेगवेगळी आहेत. लोकसभेसाठी जेवढी पसंती भाजप, मोदी यांना आहे तेवढी विधानसभा निवडणुकीसाठी नसेल असे म्हटले जाते. त्यामुळेच चाळीसपेक्षा अधिक जागा या लोकप्रियतेच्या आधारे निवडून आणाव्यात आणि सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे घ्यावी, असाही एक सूर दिल्लीतील भाजपच्या वर्तुळात आहे.