ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. १४ : शेवगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या पिंगेवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची सोमवार १४ नोव्हेंबरला संचालक मंडळाच्या १३ जागांसाठी होणारी निवडणूक मतपत्रिकांसह निवडणूक निर्णय अधिकारी गायब झाल्याने रद्द करावी लागल्याने एकच गोंधळ उडाला. प्रभारी जिल्हा उपनिबंधक पाटील व सहायक निबंधक ए. आर. पुरी यांनी यांनी तातडीने भेट देऊन पंचनामा करून निवडणूक प्रक्रिया रद्द करून सहकार निवडणूक प्राधिकरणास याबाबतचा अहवाल पाठविला. या प्रकाराने अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विद्यमान अध्यक्ष भाऊसाहेब मुंडे यांच्या विरोधात त्यांचा पुतण्या नंदकिशोर मुंडे यांनी प्रथमच बंड पुकारून स्वतंत्र मंडळ निवडणुकीत उतरविले होते. आठ-दहा दिवस चुरशीच्या वातावरणात प्रचाराचा धुराळा संपल्यानंतर सोमवार १४ नोव्हेंबरला पिंगेवाडी जिल्हा परिषद शाळेत मतदान होते. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी शिरीष भारदे रविवारी सायंकाळी चार वाजता मतपत्रिका व कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. मात्र भारदे सोमवारी सकाळी मतदान केंद्रातून गायब झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. ही माहिती मिळताच प्रभारी जिल्हा उपनिबंधक ए. पी. पाटील, शेवगावचे सहायक निबंधक ए. आर. पुरी, पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, फौजदार सुहास हट्टेकर यांनी पोलीस फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन वरिष्ठांना अहवाल पाठविला. निवडणूक अधिकारी भारदे यांचा सायंकाळपर्यंत तपास लागला नव्हता. निवडणूक अधिकारी मतपत्रिकांसह गायब झाल्याबाबत सायंकाळपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.घटनास्थळी भेट दिली असता निवडणूक निर्णय अधिकारी भारदे व कोणतीच निवडणूक यंत्रणा आढळली नाही. घटनेचा पंचनामा करुन सहकार निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविला आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेण्यात येईल.
- ए. पी. पाटील, प्रभारी जिल्हा उपनिबंधक अहमदनगर.