पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या नव्या महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे. सभागृहातील संख्याबळ पाहता भाजपा उमेदवाराचा विजय निश्चित आहे. तर, बिनविरोध निवड होण्यासाठी भाजपाच्या वरिष्ठांचे प्रयत्न सुरू आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात मंगळवारी सकाळी अकरा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. प्रथम महापौर आणि उपमहापौरपदाच्या अर्जांची छाननी होणार आहे. वैध नामांकनानंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटे दिली जाणार आहेत. निवडणूक जाहीर झाल्यास नगरसेवकांनी हात वर करून आपले मत नोंदवायचे आहे. ज्या उमेदवाराला जास्त मते पडतील त्याला महापौर घोषित करण्यात येईल. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. महापौरांच्या निवडीनंतर याच पद्धतीने उपमहापौरांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर स्थायी समिती व इतर समितींची निवड होईल.महापौर निवड होणार असल्याने महापालिकेत अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त असणार आहे. तसेच, सदस्य वगळता कार्यकर्त्यांना महापालिका भवनात सोडले जाणार नाही.पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर, भाजपाच्या पहिल्या महापौरांची निवड आज होणार आहे. पक्षीय बलाबल अधिक असतानाही राष्ट्रवादीने उमेदवारी अर्ज भरल्याने निवडणूक होणार असून, महापौर आणि उपमहापौरपदासाठी दुरंगी लढत होणार आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसची एकमुखी सत्ता उलथून लावून भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली. महापौरपदासाठी भाजपाने चऱ्होलीतील आमदार लांडगेसमर्थक नितीन काळजे यांना, तर उपमहापौरपदासाठी शैलजा मोरे यांना उमेदवारी दिली आहे. सुरुवातीला उमेदवार न देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही ऐनवेळी महापौर निवडणूक रिंगणात उमेदवार उतरविला आहे. राष्ट्रवादीकडून श्याम लांडे आणि निकिता कदम यांनी महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.स्थायी समिती सभापती चिंचवडला महापौर निवडीबाबतही चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, भोसरीतून नितीन काळजे, संतोष लोंढे, पिंपरी विधानसभा मतदारसंघातून केशव घोळवे यांच्या नावाची चर्चा होती. भोसरीकरांनी दबाव तंत्र अवलंबल्याने भाजपाचा पहिला महापौर होण्याचा मान काळजे यांना मिळणार आहे. महापालिका तिजोरीच्या चाव्या स्थायी समिती अध्यक्षांकडे असतात.
पिंपरी महापौरपदासाठी आज निवडणूक
By admin | Published: March 14, 2017 7:59 AM