- गणेश वासनिक
अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे गाड्या, प्लॅटफार्म, तिकीट आरक्षण केंद्रासह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी राजकीय पक्ष अथवा उमेदवारांकडून प्रचारासाठी लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर, स्टिकर हटाव मोहीम युद्धस्तरावर सुरू आहे. यापुढे रेल्वेत प्रचाराचे साहित्य आढळल्यास संबंधित राजकीय पक्ष अथवा उमेदवारांवर आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून मिळाले आहेत. रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या नियंत्रणात ही मोहीम राबविली जात आहे.
देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. उमेदवारी अर्ज, निवडणूक चिन्हवाटप आणि काही मतदारसंघांत प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली आहे. विशेषत: विदर्भात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल आणि दुसºया टप्प्यात १८ एप्रिल रोजी लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे उमेदवारांना बोटावर मोजण्याइतकेच दिवस प्रचाराला मिळाले आहेत. त्यामुळे बहुतांश उमेदवार आणि राजकीय पक्ष गर्दीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणूक चिन्ह, पक्ष आणि उमेदवारांचे नाव मतदारांपर्यंत सहजतेने पोहचविण्यासाठी रेल्वे गाड्या, प्लॅटफार्म, तिकीट आरक्षण केंद्रांसह अन्य महत्त्वाच्या ठिकाणी प्रचाराचे पोस्टर, बॅनर्स, स्टिकर्स लावण्याची शक्कल लढविली जात असली तरी ही बाब आचारसंहिता भंग करणारी असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रचाराचे साहित्य हटविण्याची मोहीम सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून उमेदवार किंवा राजकीय पक्षाकडून रेल्वेत प्रचार मजकूर निदर्शनास आल्यास गुन्हे दाखल करण्याची तयारी चालविली आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकाची सूक्ष्म तपासणी केली असता, गत आठवड्यात एकही निवडणूक प्रचाराचे साहित्य निदर्शनास आले नाही, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे एका अधिकाºयांनी दिली.
पँट्री कार, खाद्यपदार्थ स्टॉलची तपासणीरेल्वे गाड्यातील पँट्री कार आणि रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉलची निवडणूक आचारसंहिता भंगप्रकरणी तपासणी केली जात आहे. चहा, कॉफीसाठी वापरले जाणारे कागदी कप, खाद्यपदार्थाकरिता कागदी प्लेटसुद्धा तपासणीच्या सूचना रेल्वे बोर्डाने दिल्या आहेत. त्यानुसार रेल्वे यंत्रणा कार्यरत आहे. राजकीय पक्ष किंवा उमेदवारांचे प्रचारसाहित्य लावणे किंवा वाटप करु नये, यासाठी खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
प्लॅटफार्मवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना प्रचारसाहित्य, मजकूर वाटप करू नये. महत्त्वाच्या ठिकाणची नियमित तपासणी केली जात आहे. रेल्वे गाड्यातील पँट्री कारचे विक्री साहित्याची कसून तपासणी सुरू आहे.- शरद सयाम, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक, बडनेरा.