पुणे : महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी येत्या शुक्रवारी (दि. ७) मतदान होत आहे. यासाठी सोमवारी भाजपा व राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँगे्रसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विषय समित्यांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँगे्रस आणि काँग्रेस एकत्र आले असून, सर्व जागांसाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. परंतु, भाजपाकडे बहुमत असल्याने याच पक्षाचे सर्व समित्यांवर अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार हे स्पष्ट आहे.महापौर, उपामहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीनंतर आता विविध विषय समित्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तरी भाजपासाठी ही निवडणूक केवळ औपचारिकता असेल.विधी समितीसाठी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी अॅड. गायत्री खडके, तर उपाध्यक्षपदासाठी जयंत भावे यांनी आणि राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी भैयासाहेब जाधव व उपाध्यक्षपदासाठी अॅड. हाजी गफूर पठाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. क्रीडा समितीसाठी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी सम्राट थोरात व उपाध्यक्षपदासाठी श्वेता खोसे-गलांडे यांनी, तर राष्ट्रवादीकडून रफीक धनकवडे आणि किशोर धनकवडे यांनी अर्ज दाखल केले आहेत. (प्रतिनिधी)शहर सुधारणा समितीसाठी भाजपाकडून अध्यक्षपदासाठी महेश लडकत यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी किरण दगडे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँगे्रसकडून सुमन पठारे आणि प्रदीप गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. महिला व बाल कल्याण समितीसाठी अध्यक्ष पदासाठी भाजपाच्या राणी भोसले आणि उपाध्यक्षपदासाठी ज्योती गोसावी यांचे अर्ज असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सायली वांजळे आणि उपाध्यक्षपदासाठी लक्ष्मी आंदेकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.
अध्यक्षपदासाठी निवडणूक शुक्रवारी
By admin | Published: April 04, 2017 1:16 AM