भाईंदर, दि. 28 - मीरा भाईंदर महापालिका महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया सोमवारी सकाळी सुरू झाली. या निवडणुकीत महापौरपदी अपेक्षेप्रमाणे भाजपाच्या डिंपल मेहता विजयी झाल्या आहेत. शिवसेनेच्या अनिता पाटील यांचा पराभव करत डिंपल मेहता यांनी विजय मिळवला. डिंपल मेहता यांना 61 मतं मिळाली तर अनिता पाटील यांना 34 मतं मिळाली. महापौरपदासाठीच्या शिवसेनेच्या उमेदवार अनिता पाटील यांना काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी सुद्धा मतदान केलं. काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्ष नगरसेवकांनीदेखील सेनेच्या अनिता पाटील यांना मतदान केलं.
महापौर पदाच्या या निवडणुकीसाठी भाजपाचे 61 नगरसेवक भगवे फेटे घालून सभागृहात उपस्थित झाले होते. तर शिवसेना व काँग्रेसचे नगरसेवक एकत्र सभागृहात दाखल झाले. भाजपाकडून डिंपल मेहता या महापौरपदासाठीच्या उमेदवार होत्या तर शिवसेनेकडून अनिता पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे मीरा भाईंदर महापालिकेत महापौरपदासाठी भाजपा विरूद्ध शिवसेना अशी थेट लढत बघायला मिळली. निवडणूक प्रक्रियेपूर्वी भाजपाकडून वंदना भावसार यांनी उमेदवारी अर्ज भरला होता पण त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला.
तर मीरा भाईंदर महापालिका उपमहापौर पदी अपेक्षे प्रमाणे भाजपचे चंद्रकांत वैती विजयी झाले. काँग्रेसच्या अनिल सावंत यांचा त्यांनी पराभव केला. चंद्रकांत वैती यांना 61 मतं मिळाली तर सावंत यांना 34 मतं मिळाली. सावंत यांना शिवसेनेच्या 22 नगरसेवकांनीसुद्धा मतदान केले. काँग्रेस पुरस्कृत 2 अपक्ष नगरसेवकांन देखील सावंत यांना मतदान केले. वैती हे माजी उपमहापौर तसेच माजी विरोधी पक्षनेते होते.
मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने एकहाती सत्ता राखली. बहुमताचा आकडा पार करत भाजपने 61 जागांवर विक्रमी आघाडी घेतली आहे. भाजपाच्या लाटेनं इतर पक्षांचा सुपडा साफ केला शिवसेना 22, काँग्रेस 10 आणि इतरांना 2 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे. मीरा-भाईंदरमध्ये पालिका निवडणुकीत भाजपाच सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला तर शिवसेनेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली असून तिसऱ्या स्थानावर फेकली गेली. राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेला यावर्षी चांगले यश मिळाले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनाला 15 जागा मिळाल्या होत्या. यावेळी सत्तेचं स्वप्न जरी भंगलं असलं तरी सेनेच्या जागेत वाढ झाली आहे. अतिम निकाल हाती आला असून सेनेच्या वाट्याला 22 जागा मिळाल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत मिरा भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर होती. राष्ट्रवादीकडे भाजपखालोखाल 27 जागा होत्या. पण यावेळी राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आला नाही. एकही जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीची मोठा धक्का बसला आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसला 9 जागांच नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा आल्या होत्या. मात्र, यावेळी काँग्रेसच्या 10 जागांवर समाधान मानावं लागले आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे काँग्रेसच्या एका जागेवर बिनविरोध जिंकली. अल्पसंख्याक मतांवर मदार असलेल्या काँग्रेसला यावेळी मतदारांनी हात दाखवलाय.
मीरा भाईंदर महापालिकेच्या 2012च्या निवडणुकीत भाजपानंच सर्वाधिक 32 जागा मिळवल्या होत्या, मात्र त्याच वेळी काँग्रेसनं 18 आणि राष्ट्रवादीनं 26 जागा मिळवून अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन केली होती. पहिल्या अडीच वर्षात काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, अपक्षांची सत्ता होती. मात्र त्यानंतर पुन्हा शिवसेना आणि भाजपानं सत्ता खेचून आणली होती. नंतरच्या अडीच वर्षात भाजपा, शिवसेना एकत्र आले आणि त्यांनी बहुजन विकास आघाडी, अपक्षांची मोट बांधत सत्ता स्थापन केली. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधात बसावे लागले होते. भाईंदर महापालिकेच्या 2012च्या महापालिका निवडणुकीत भाजपा 32, शिवसेना 15, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 26, बहुजन विकास आघाडी 3, एका अपक्षाचा विजय झाला होता.