Maharashtra Election 2019: प्रचारतोफा थंडावल्या, 'चंपा, टरबूज, हिरवा नाग, नटरंग अन् नाच्या'नंच गाजला
By महेश गलांडे | Published: October 19, 2019 08:56 PM2019-10-19T20:56:16+5:302019-10-19T20:58:55+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा झंझावती प्रचार दौरा जेवढा चर्चेचा विषय बनला.
महेश गलांडे
मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावल्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रमुख मुद्द्यांऐवजी वैयक्तिक टीका टीपण्णीनेच प्रचारसभा गाजल्याचं दिसून आलं. या सभांमध्ये भाषण करताना प्रचाराची पातळी खालवल्याचं स्पष्टपणे जामवलंय. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडताना ज्येष्ठ नेत्यांकडूनही खालच्या भाषेत एममेकांवर टीका करण्यात आली. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचा, विशेषत: प्रमुखांचा समावेश आहे. अगदी, राष्ट्रीय नेते आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचारात प्रमुख मुद्द्यांशिवाय व्यक्तीगत टीका-टीपण्णीला प्राधान्य दिल्याचं दिसून आलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा झंझावती प्रचार दौरा जेवढा चर्चेचा विषय बनला. तेवढंच, पवारांचे हातवारे हेही यंदाच्या निवडणुकीत चर्चेचा विषय बनला आहे. आपल्या पक्षातून भाजपा-शिवसेनेत गेलेल्या नेत्यांवर नाव न घेता पवारांनी टीका केला. पण, अश्लील हातवारे करत या नेत्यांना पवारांनी टार्गेट केलं. उस्मानाबाद येथील सभेतून पवारांचे हे हातवारे सुरू झाले होते, ते बार्शीतील सभेनंतर महाराष्ट्रभर चर्चिले गेले. जर, विकासच करायचा होता, तर तुला आमदार केलं, मंत्री केलं, तेव्हा काय तू गवत उपटलं का? असा प्रश्नही पवारांनी आपल्या जाहीर सभेतून उपस्थित केला. शरद पवारांचं राजकारण आणि नेतृत्व हे सृजनशील मानलं जातं. पण, यंदा पवारांच्या सभेतील हातवाऱ्यांमुळे त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला असा प्रचार शोभत नसल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली.
शरद पवारांनी हातवारे करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. 'कुस्ती पैलवानांशी होते, या 'अशांशी' होत नाही' असं म्हणत पवारांनी हातवारे केले होते. जळगावमधील प्रचार सभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं. 'नटरंग'सारखे हातवारे करण्याची आम्हाला सवय नाही, असं म्हणत पवारांना टोला लगावला. मात्र, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही ही भाषा न शोभणारी आहे. यापूर्वीही मी सर्वात मोठा गुंड आहे, साम-दाम-दंड-भेद याचा वापर करण्यात येईल, असे विधान फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे प्रचाराच्या या आरोप-प्रत्यारोपात मुख्यमंत्रीही संयम गमावून बसले.
राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करताना त्यांचा चंपा असं म्हटलं. चंपा म्हणजे चंद्रकात पाटील यांच्या नावाचा शॉर्टफॉर्म असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. मात्र, अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियातून चंद्रकांत पाटील यांना चंपा या नावानेच टीका-टीपण्णी करण्यात येऊ लागली. अजित पवारांच्या या 'चंपा'ची री.. ओढत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्याच्या सभेतही व्यासपीठावर चंपा गाजली. प्रेक्षकांमधून चंपा हे नाव येताच, राज यांनीही हसून या नावाला दाद दिली. तसेच पुणेकर नाव ठेवण्यात पटाईत असल्याचं राज यांनी म्हटले.
राज ठाकरेंनी पुण्यातील कसबा येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून टरबूज हा शब्द वापरला. विशेष म्हणजे, काहीजण गरोदर बाईसारखे दिसतात, असंही नाव न घेता मुख्यमंत्र्यांकडे रोख ठेऊन राज यांनी म्हटले होते. राज ठाकरेंसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही प्रचाराची पातळी सोडल्याचं दिसून आलं. उद्धव यांनी औरंगाबादेतील सभेत वंचितचे खासदार इम्तियाज जलिल यांना उद्देशून हिरवा नाग असा शब्दप्रयोग केला होता. तसेच, भगव्याला सोडून हिरव्याला जवळ केलं म्हणत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं.
उद्धव ठाकरेंनी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना उद्देशून टीका केली होती. उद्धव यांच्या टीकेला उत्तर देताना, हर्षवर्धन जाधव यांनीही पातळी सोडून टीका केली. अब्दुल सत्तारांच्या शिवसेना प्रवेशावरुन हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. अब्दुल सत्तार तुमचा कोण......? पाहुणा आहे का? असे म्हणत हर्षवर्धन यांनी अर्वाच्य भाषा वापरली. त्यानंतर, शिवसैनिकांकडून हर्षवर्धन यांच्या घरावर हल्लाही करण्यात आला होता. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबडेकर यांच्याही एका वक्तव्याची जोरदार चर्चा होती. भाजपला मतदान करणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असं वादग्रस्त वक्तव्य प्रकाश आंबडेकर यांनी केलं होतं. यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महत्त्वाचा फक्टर आहे, त्यामुळे आंबेडकरांच हे वक्तव्यही टीकेचा धनी बनलं होतं.
अजित पवारांनी सोलापूर येथील सभेत माजी मंत्री आणि भाजपा उमेदवार लक्ष्मण ढोबळेंना नाच्या म्हटले होते. ढोबळेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यावरुन अजित पवारांनी ढोबळेंवर मंगळवेढा येथील सभेत टीका केली होती. ढोबळेंनीही अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, अजित पवार कुठं कुठं नाचतात हे मला सांगायला लावू नका, मी तोंड उघडले तर.. असे म्हणत त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्याचा प्रयत्न केला होता. बीडमधील परळी मतदारसंघात भाऊ-बहिणीची रंगतदार लढत होत आहे. पण, येथेही धनंजय मुंडेंकडून वैयक्तिक टीका झाल्याचा आरोप पंकजा यांनी केला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातील भाषण करतानाच पंकजा यांना भोवळ येऊन त्या स्टेजवरच कोसळल्या.
यंदाच्या निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणात डिजिटल प्रचार पाहायला मिळाला. सोशल मीडियातूनही सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते मोठा प्रचार करत होते. सोशल मीडियातून प्रचाराची रंगत पाहायला मिळाली. त्यामुळे सर्वच पक्षातील प्रमुख नेत्यांचा समाचार नेटीझन्सकडूनही घेण्यात आला. अनेकांनी नेत्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली तर काहींनी विरोधही केला. एकंदरीत, यंदाच्याही निवडणुकीत विकास, शेतकरी, कामगारांचे प्रश्न, शिक्षण, औद्योगिकरणाचे मुद्दे बाजुला पडले. या निवडणुकीतही महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देत, केवळ वैयक्तिक टीका टीपण्णी करताना, पक्षप्रमुखांकडून पातळी सोडून प्रचार झाल्याचं पाहायला मिळालं.