म्हारळ : ही निवडणूक केवळ नगरसेवक निवडून देणारी नाही तर महापालिकेत जायचे की नाही, याबाबतचे सार्वमत ठरणारी आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावात आयोजिलेल्या प्रचार सभेत बोलताना केला. ते पुढे म्हणाले, २७ गावे ही ग्रोथ सेंटर होऊ शकतात आणि त्यासाठी १००० कोटींची तरतूद एम.एफ.आर.डी.ए. च्या माध्यमातून करण्यात आली आहे. भाजपाचे सर्व उमेदवार संघर्ष समितीच्या बॅनर खालीच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूका लढवतील असे जाहीर केले.कल्याण ग्रामीण परिसरातील प्रिमीअर कॉलनीच्या मैदानात सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या जाहीर सभेत बोलत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणूकीला या २७ गावांना सामोरे जाऊ लागू नये, त्यासाठी मी घाईघाईने गावे पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. मात्र मला खरी परिस्थिती समजल्यावर ती गावे पुन्हा वगळण्यासाठी नोटीसीफीकेशन काढले परंतु निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे ती वगळू शकली नाहीत. या २७ गावांना स्वतंत्र धावण्याची संधी उपलब्ध व्हावी. त्यासाठी पायातपाय अडकवून चालणार नाही व त्यासाठी ग्रोथ सेंटर होऊ शकते म्हणून मी एमएमआरडीए च्या अध्यक्ष नात्याने १००० कोटींची तरतूदही केली व २०/८/२०१५ ही तारीखही सांगितले. तारखेचे कारण सांगताना लगेच काहीजण निवडणूक आयोगास आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार करतात असा टोलाही शिवसेनेस लगावला. १००० कोटींची तरतूद करूनही जर पालिका या गावांचा विकास करू शकली नाही तर उपयोग काय? असा सवालही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी भाजपाचे खासदार कपील पाटील, आ. रविंद्र चव्हाण, आ. नरेंद्र पवार, मंदाताई म्हात्रे, किसन कथोरे, माजी आ. रमेश पाटील, प्रवीण दरेकर, माजी खासदार संजीव नाईक सह संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, गणेश म्हात्रेंसह उमेदवारांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
ही निवडणूक म्हणजे महापालिकेबाबतचे सार्वमत
By admin | Published: October 21, 2015 3:20 AM