मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या 'यंग ब्रिगेड'मध्ये सामील असलेले गेवराईचे विजयसिंह पंडित यांना विधानसभा निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. मतमोजणीत अपक्ष उमेदवार बदामराव पंडित यांचे मीटर मंदावल्याने भाजप उमेदवार लक्ष्मण पवार यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या विजयसिंह पंडित यांची विधानसभेची उमेदवारी खुद्द शरद पवारांनी बीडमध्ये येऊन जाहीर केली होती. त्यामुळे त्यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा गेवराईत सुरू होती. त्याचवेळी शिवसेनेत दाखल झालेले मात्र युती झाल्यामुळे अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बदामराव पंडितांमुळे विजयसिंह यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली होती.
गेवराईतून भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात 'काटे की टक्कर' झाली. यात अपक्ष बदामराव देखील जोमात होते. मात्र निकाल अंतिम होईपर्यंत लढाई भाजप-राष्ट्रवादीतच रंगली. यात विजयसिंह यांना 92 हजार 830 मते पडली. तर विजयी उमेदवार पवार यांना 99 हजार 625 मते मिळाली. पवारांच्या विजयातील फरक केवळ 6 हजार 792 मतांचा होता. तर अपक्ष उमेदवार बदामराव यांना 50 हजार 894 मते मिळाली. बदामराव यांना मिळालेली ही मते लक्षणीय होती. अर्थात ही मते मोठ्या प्रमाणात भाजपची होती.
गेवराईतून बदामराव यांच्या उमेदवारीमुळे आमदार होण्याचं विजयसिंह पंडितांचं स्वप्न पूर्ण होणार अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु, मतमोजणीत बदामराव यांचं मीटर थंडावले आणि लक्ष्मण पवार यांची लीड वाढत गेली. विजयाचा फरक कमी राहिला असला तरी बदामराव यांचा आणखी जोर असता, तर विधानसभेची विजयसिंह पंडितांची वाट चुकली नसती, अशी चर्चा गेवराईत आहे.