मुंबई : धनंजय मुंडे आणि तानाजी सावंत हे दोघे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या २ जागांसाठी चालू महिन्यात निवडणूक होत आहे. मुंडे हे विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर निवडून गेले होते. पुढे ते विरोधी पक्षनेते झाले. मात्र, अलिकडेच ते परळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधान परिषद जागेसाठीची निवडणूक २४ जानेवारीला होईल. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून शिवसेनेचे तानाजी सावंत विधान परिषदेवर निवडून गेले होते.अलिकडे ते उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडा मतदारसंघातून शिवसेनेकडून विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त जागेसाठी ३१ जानेवारीला निवडणूक होणार आहे. मुंडे यांची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे ती राष्ट्रवादीकडेच राहील. महाविकास आघाडीचे विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. यवतमाळमध्ये मात्र शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होऊ शकते.
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या दोन जागांसाठी २४, ३१ जानेवारीला निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 4:04 AM