ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 30 - नवीन सार्वजनिक विद्यापीठ कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वच विद्यापीठातील प्रशासनांसमोर प्राधिकरणांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान आहे. कायदा लागू होऊन ४ महिने उलटून गेल्यानंतर शासनाने अर्धवट अधिनियम जारी केले. त्यातच विद्याशाखांबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला उशीर झाला. या सर्वांचा फटका निवडणूक प्रक्रियेला बसला असून ३१ आॅगस्टपर्यंत निवडणूका होणे अशक्यच असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नवीन कायदा लागू झाल्यामुळे विद्यापीठाला ३१ आॅगस्टपर्यत व्यवस्थापन, सिनेट, विद्वत परिषद ही प्राधिकरणे तयार करावी लागणार आहे. सिनेट, व्यवस्थापन आणि विद्वत परिषदेवर सदस्याच्या निवडीसाठी निवडणुका घेण्यात येणार आहे. व्यवस्थापन परिषदेवर २३ सदस्य, सिनेटमध्ये ७२ आणि विद्वत परिषदेमध्ये ३८ सदस्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश पदे कुलगुरू, कुलपती नामित असल्याने सिनेटमध्ये असलेले पदवीधर, अभ्यासमंडळावर येणारे प्राध्यापक, प्राचार्य आणि संस्थांचे प्रतिनिधी यासाठी विद्यापीठाला निवडणुका घ्याव्या लागणार आहे. यात विद्यापीठाचा सर्वाधिक कस पदवीधर गटाच्या दहा सदस्यांच्या निवडणुकांसाठी लागणार आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंडळातर्फे विद्यापीठांचे एक समान अधिनियम काढण्यात आला. मात्र त्यात अर्धवट माहिती आहे. विद्यापीठाकडून निवडणूकीसाठी विशेष सेलदेखील स्थापन करण्यात आला. मतदार नोंदणीचे काम जून महिन्यातच सुरू होणे अपेक्षित होते. मात्र विविध अभ्यासक्रमांना कुठल्या विद्याशाखेत समाविष्ट करायचे यासंदर्भात गठीत राज्य शासनाच्या समितीचा अहवाल उशीरा आला. शासनाने मागील आठवड्यात विद्याशाखांचे चित्र स्पष्ट करणारे पत्र पाठविले. त्यामुळे विद्यापीठाला निवडणूकांची नियमावली जाहीर करता आली नाही.मतदार नोंदणीच्या प्रक्रियेला विलंबसाधारणत: पुढील आठवड्यात निवडणूक नियमावली जाहीर करण्यात येईल. त्यानंतर फॉर्म-अच्या माध्यमातून पदवीधर सदस्यांची नोंदणी करण्यात येईल. याला १ महिन्याचा कालावधी द्यावा लागेल. त्यानंतर यादी तयार करावी लागेल व मग मतदार नोंदणीची प्रक्रिया होईल. या संपूर्ण प्रक्रियेत कमीत कमी अडीच महिन्यांचा कालावधी लागेल. अशा स्थितीत ३१ आॅगस्टपर्यंत निवडणूका घेणे शक्यच नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.पुढील आठवड्यात नियमावली जारी होणारयासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांना विचारणा केली असता विधीसभेसाठी घेण्यात येणाऱ्या निवडणुका या ३१ आॅगस्टपर्यंत पार पडणे कठीण असल्याचे मान्य केले. विद्याशाखांचे चित्र स्पष्ट झाले असून आता नियमावलीदेखील जवळपास तयार झाली आहे. पुढील आठवड्यात नियमावली जाहीर होईल व लगेच प्रक्रियेला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.
31 आॅगस्टपर्यंत निवडणुका अशक्यच
By admin | Published: June 30, 2017 9:14 PM