Jayant Patil On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांच लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अखेर जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. याबाबतची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रसे शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकाच टप्प्यात निवडणूक आणि आता ते (महायुती) एका टप्प्यात पराभूत होतील, असं म्हणत जयंत पाटलांची महायुतीला टोला लगावला आहे.
महायुतीचे सरकार घाबरले आहे. महायुती पाहिजे त्या घोषणा करून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, हे महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा विजय होणार आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होत आहे. त्यामुळे आता ते (महायुती) एका टप्प्यात पराभूत होतील, असा टोला जयंत पाटील यांनी महायुतीला लगावला. तसेच, राज्यपाल नियुक्त आमदारांच्या शपथविधीवरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया दिली. १२ पैकी ७ जणांना आमदारकी दिली. आता उर्वरित ५ जागांचं आमिष इतर सगळ्यांना दाखवलं जाईल, असे जयंत पाटील म्हणाले.
पुढे जयंत पाटील म्हणाले की, लोकसभेसाठी महाराष्ट्रात निवडणूक सात टप्प्यात घेण्यात आली आणि आज अचानकपणे विधानसभा निवडणूक एका टप्प्यात जाहीर करण्यात आली. सरकारला बराच वेळ मिळाला आणि सरकारने मनाला येईल तशा योजना जाहीर केल्या. राज्याची तिजोरी रिकामी केली. तिजोरीत काहीही नसताना शक्य असेल तेवढं वाटप करण्याचा काम केलं. शेवटी आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापुढे सरकार आता नवीन काही योजना जाहीर करणार नाही.
याचबरोबर, जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरूनही महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजनेला कोणताही विरोध केलेला नाही. उलट आम्ही महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना महायुतीने दिलेल्या लाभापेक्षा जास्त फायदा लाडक्या बहिणींचा कसा होईल, यासाठी आम्ही आमचं सरकार आल्यानंतर उपाययोजना करण्याचं काम करणार आहोत, असंही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात निवडणूक कधी?महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर २०२४ तर उमेदवारी अर्ज पडताळणी ३० ऑक्टोबर २०२४ तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ तर मतदानाची तारीख २० नोव्हेंबर २०२४ आणि मतमोजणीची तारीख २३ नोव्हेंबर २०२४ असणार आहे.