यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विधानसभेच्या सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधान परिषदेच्या ११ जागांसाठीची निवडणूक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीमध्येदेखील जोरदार रस्सीखेच पाहायला मिळू शकते.
विधान परिषदेच्या ११ विद्यमान सदस्यांच्या आमदारकीची सहा वर्षांची मुदत जुलैअखेर संपणार असल्याने जून महिन्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणूक २६ जून रोजी होणार आहे. त्यानंतर लगेच ही निवडणूक होईल, अशी शक्यता आहे. याशिवाय अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठीची निवडणूक २५ जून रोजी होणार आहे. आगामी काही दिवसांत विधान परिषदेच्या एकूण १५ आणि राज्यसभेच्या एका जागेसाठीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघेल.
११ आमदार विधानसभा सदस्यांमधून निवडून जाणार असल्याने अर्थातच महायुतीचा दबदबा असेल. चार आमदारांच्या निधनामुळे आणि एकाच्या राजीनाम्यामुळे विधानसभेच्या पाच जागा रिक्त आहेत. तसेच १४ विधानसभा सदस्य लोकसभेची निवडणूक लढत आहेत. त्यातील जे खासदार म्हणून जिंकतील त्यांना आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. ही सगळी संख्या गृहीत धरून विधान परिषद निवडणुकीसाठीचा मतांचा कोटा निश्चित केला जाईल.
महायुतीचे संख्याबळ लक्षात घेता ११ पैकी ८ ते ९ जागा ते लढतील असे मानले जाते. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले तर विधान परिषदेच्या ११ पैकी ९ जागा लढण्याची जोखीम महायुती घेण्याची शक्यता आहे. महायुतीत आपसात जागावाटपावरून रस्सीखेच होऊ शकते. महाविकास आघाडीतही नाराजी होऊ शकते. निवडणूक बिनविरोध होणार का, याबाबतही उत्सुकता असेल.
'या' आमदारांचा कार्यकाळ संपणार
बाबाजानी दुर्राणी (अजित पवार गट), वजाहर मिर्झा, डॉ. प्रज्ञा सातव (काँग्रेस), मनीषा कायंदे (शिंदेसेना), अनिल परब (उद्धवसेना), भाई गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील (भाजप), जयंत पाटील (शेकाप) आणि महादेव जानकर (रासप) या ११ विधान परिषद सदस्यांचा कार्यकाळ २७ जुलै रोजी संपणार आहे.
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराचे काय?
- भाजप-शिंदे एकत्र येऊन २०२२ मध्ये युतीचे सरकार स्थापन झाले, पुढे अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळ विस्ताराची फक्त चर्चाच होत आली आहे.
- लवकरच विस्तार करू,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आले आहेत.
- लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पत्रकारांनी विचारले असता लोकसभा निवडणुकीनंतर विस्तार करू, असे फडणवीस यांनी सांगितले होते.
- विधानसभेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल. जूनमध्ये विस्तार केला तर नवीन मंत्र्यांना चार-साडेचार महिने मिळतील.
महामंडळांवरील नियुक्त्या सरकार लवकरच करणार
- राज्य सरकारची महामंडळे आणि विविध समित्यांवरील रखडलेल्या नियुक्त्या लोकसभा निकालानंतर लगेच करण्यात येतील, असे सत्तारूढ तीन पक्षांच्या समन्वय समितीचे समन्वयक प्रसाद लाड यांनी ‘लोकमत’ला गुरुवारी सांगितले.
- ते म्हणाले, की भाजपला ५० टक्के पदे तर शिंदेसेनेला २५ टक्के आणि अजित पवार गटाला २५ टक्के पदे हा फॉर्म्युला आधीच ठरलेला आहे. तिन्ही पक्षांनी त्यास मान्यता दिली आहे. कोणाकोणाची नियुक्ती करायची याची बव्हंशी यादीही तयार आहे.