ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि.01 - वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी तुल्यबळ उमेदवार समोर केल्याने निवडणुक अतितटीची बनली आहे.
वाशिम जिल्ह्यातील कारंजा, वाशिम व मंगरुळपीर नगर परिषदेचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या डिसेंबर महिन्यात संपुष्टात येत असल्याने, ही निवडणूक होत आहे. २७ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, प्रमुख पक्षांनी स्वबळावर निवडणुकीची तयारी केली आहे. वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतर्फे माजी नगराध्यक्ष अशोक हेडा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे नगरसेवक राजू वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी उपाध्यक्ष माधवराव अंभोरे, भारतीय जनता पार्टीतर्फे डॉ. हरिष बाहेती, भारिप-बमसंतर्फे शे. फिरोज शे. इस्माईल हे तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जातीय समिकरण, पक्ष संघटन, उमेदवारांचा जनसंपर्क आदी बाबी हेरून प्रमुख पक्षांनी तुल्यबळ उमेदवार जाहिर केल्याने, निवडणुकीत रंगत आली आहे. देशात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने वाशिम येथे भाजपाची सत्ता कायम ठेवण्याची कसरत आमदार तथा जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटणी यांना करावी लागणार आहे. शिवसेनेने तगडा उमेदवार समोर करून सर्वांसमोरच तगडे आव्हान उभे केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील तुल्यबळ उमेदवार निवडणुक रिंगणात उतरवून रंगत आणली आहे. गतवेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्ज असून, ऐनवेळी दगाबाजी नको म्हणून अंतर्गत गटबाजीवर नियंत्रण ठेवून असल्याचे दिसून येते. भारिप-बमसंने धक्कादायक तंत्राचा अवलंब करीत एससी व अल्पसंख्याक मतपेढीवर लक्ष केंद्रीत करून सर्वांचे राजकीय अंदाज चुकविण्याचा प्रयत्न चालविला आहे. प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याने निवडणुक अतितटीची बनली आहे.