ठाणे : ठाणेकरांच्या सेवेसाठी महापालिका आयुक्तांनी इलेक्ट्रिक बसची संकल्पना जरी पुढे आणली असली, तरी ही सेवा ठाणे परिवहन सेवेच्या मुळावर उठणार आहे. इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून एसी बसचे मार्गच बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे, असा आरोप शुक्रवारी परिवहन समितीच्या बैठकीत विरोधकांनी केला. टीएमटीच्या एसी बसच्या मार्गामुळे रोज सहा लाखांचे उत्पन्न मिळत आहे. परंतु, इलेक्ट्रिक बस या एसी बसच्या उत्पन्नावर डल्ला मारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या बसचे मार्ग ठरवण्याचे अधिकार देऊ नयेत, असा नारा विरोधकांनी करूनही त्यांचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर परिवहनला आर्थिक डबघाईत घालण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. याचे पडसाद शुक्रवारी झालेल्या परिवहन समितीच्या बैठकीत उमटले. या बसच्या खरेदीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला असता, या अनुषंगाने मनसेचे राजेश मोरे यांनी प्रशासनाची पोलखोल केली. >एकही एसी बस धावणार नाहीखाजगी माध्यमातून चालवण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक बस टीएमटीला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या एसी मार्गावर चालवल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिक बस या मार्गावर धावल्यास त्या मार्गावर एकही एसी बस धावणार नसल्याचा उल्लेख स्थायीने मंजूर केलेल्या प्रस्तावात असल्याचा पुरावाही राजेश मोरे यांनी सादर केला. त्यामुळे अशा पद्धतीने टीएमटीचे कंबरडे मोडण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही तकी चेऊलकर यांनी केला. हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी या सदस्यांनी लावून धरली. परंतु, हा प्रस्ताव महासभेने आणि स्थायीने मंजूर केल्याचे कारण पुढे करत सत्ताधाऱ्यांनी यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला.
इलेक्ट्रिक बस एसी बसच्या मुळावर
By admin | Published: August 06, 2016 3:11 AM