महागाईचा भडका एवढा आहे की सर्वच कंपन्या त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशात महिन्याच्या अखेरीस दमडीही शिल्लक राहत नाहीय. अशातच आता महाराष्ट्रात विजेचे दर वाढणार आहेत. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी राज्यातील वीज ग्राहकांच्या वीज बिलात जवळपास ७.५० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात महावितरण विजेच्या दरांत १० टक्क्यांची वाढ करणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. पुणे मिररने याचे वृत्त दिले आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला मान्यता दिली होती. यानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे.
महावितरणच्या या दरवाढीचा फटका घरगुती वीज ग्राहकांपासून, शेतकरी, व्यापारी आणि औद्योगिक कंपन्यांनाही बसणार आहे. गेल्या वर्षी देखील दरवाढ केल्याने वीज बिलात सव्वा सात टक्क्यांची सरासरी वाढ झाली होती. आता पुन्हा यंदाच्या आर्थिक वर्षात साडे सात टक्क्यांची सरासरी बिलात वाढ होणार आहे.
0 ते 100 युनिटपर्यंत वीज दरात कोणतीही वाढ केली जाणार नसून 101 ते 300 युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना वीज दर 10.81 रुपयांवरून 11.46 रुपये प्रति युनिट आकारला जाणार आहे. तर 501 ते 1000 युनिट वीज वापर असलेल्या ग्राहकांना 16.74 रुपयांवरून 17.81 रुपये वीज दर आकारला जाणार आहे.