मयूर तांबडे,
पनवेल- महावितरण व त्यांच्या भोंगळ कारभाराचा अनुभव पनवेलकरांना वारंवार येतच असतो. मात्र आता त्यांच्या कारभाराचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. मोरबे येथील एका वीज ग्राहकाच्या घरात वीज मीटर येण्याआधीच महावितरणने वीज बिल पाठविण्याचा प्रताप केला आहे. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पनवेल तालुक्यात महावितरणच्या कारभारामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. वारंवार वीज जाणे, विजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे यामुळे नागरिकांना अंधारात राहण्याची नामुष्की ओढवते. हे थोडे की काय, तालुक्यातील पनवेल शहरापासून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरबे गावात राकेश शिद यांना विजेचे मीटर बसण्याआधीच महावितरण कंपनीकडून वीज बिल पाठविण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात मीटर बसलेले नाही. न बसवलेल्या मीटरचे शिद यांना चक्क २,७०० रु पयांचे बिल आले आहे. हे बिल कसे भरायचे, असा प्रश्न शिद यांना पडला आहे. पनवेल तालुक्यात ज्या आदिवासी बांधवांकडे विजेचे मीटर नाही त्यांना व इतर नागरिकांना मागेल त्याला वीज मीटर देण्यासाठी भिंगारी येथील महावितरणने गतवर्षी विशेष मोहीम राबविली होती. त्यानुसार मीटरसाठी लागणारे दोनशे पन्नास रुपयांचे डिपॉझिट भरण्यात आले होते. यात शेकडो ग्राहकांनी वीज मीटर घेतले. मात्र मोरबे येथील राकेश शिद यांच्याकडे विजेचे मीटर बसलेले नाही. एप्रिल महिन्यापासून शिद यांच्याकडे वीज मीटर बसवल्याचे महावितरणने ग्राह्य धरले. मात्र पुरवठा १८ नोव्हेंबर २0१५ रोजी केला असल्याचे विद्युत बिलामध्ये लिहिले आहे. त्यानुसार राकेश शिद यांना एप्रिल महिन्यापासूनचे ७ महिन्यांचे तब्बल दोन हजार सहाशे ऐंशी रु पयांचे वीज बिल पाठविण्यात आले आहे. त्यामुळे न बसलेल्या विद्युत मीटरचे बिल पाठवून महावितरणने ग्राहकांची थट्टा उडवली आहे. यासंदर्भात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता स्वामी विवेक यांना विचारले असता शाखा अभियंता यांच्याकडून माहिती मागितली आहे, त्यानुसार लेखी अहवाल मागितला आहे, चौकशी चालू आहे, याची माहिती घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.>तालुक्यातील मीटर वाटप योजनेवेळी आम्ही नव्या विजेच्या मीटरसाठी नोंदणी केली होती. मात्र अद्यापदेखील मीटर बसलेला नाही. मात्र दोन हजार सहाशे ऐंशी रु पयांचे वीज बिल आले आहे.- राकेश शिद, मोरबे