लोकमत न्यूज नेटवर्कराजगुरुनगर : खेड तालुक्यात वीज मंडळाचा भोंगळ कारभार याबाबत वृत्त ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. या बातमीमुळे वीज मंडळ खडबडून जागे झाले. प्रशासनाने दखल घेऊन आज चांडोली येथील वीज उपकरणे ठेवण्यात आलेली जागा स्वच्छ केली. वीज उपकरणाभोवती असलेली झाडेझुडपे तोडून टाकण्यात आली. गवत काढण्यात आले. जुनी व वापर नसलेली वीज मीटरची झाकणे जाळण्यात आली. इमारतीची स्वच्छता करण्यात आली. जमिनीवर पडलेले आॅइल स्वच्छ करण्यात आले.चांडोली येथे खेड व मावळ या दोन तालुक्यांसाठी इन्सुलेटर, पोल, कंडक्टर, केबल, मीटर यांचे स्टोअरेज आहेत. मात्र काही वापरात नसलेले कोट्यवधी रुपयांचे विजेचे साहित्य एकत्र पडून आहे. अधिकारी-कर्मचारी वेळेत येतच नाही. त्यामुळे ग्राहकांना तासनतास वाट बघावी लागत आहे. अनेक वेळा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागतात. नेहमी उशिरा येणारे अधिकारी व कर्मचारी दोन दिवसांपासून सकाळी १० वाजता कार्यालयात येत असल्याचे दिसून आले.खेड येथील चांडोली येथे कोट्यवधी रुपयांची केबल, लोखंडी तारा, खराब झालेले मीटर, इन्सुलेटर, लोखंडी पोल, कंडक्टर तसेच आॅईल भरलेल्या रिकाम्या तसेच काही भरलेल्या आहेत. परिसरात पूर्णपणे वाळलेले गवत आहे. केबल सुरक्षित ठेवण्यासाठी लाकडी झाकणे आहेत. ती पूर्णपणे मोडून गेली असून केबल बाहेर पडल्या आहेत. डीपीचे आॅईल येथे सांडलेले आहे. त्यामुळे चुकून या परिसरात आग लागल्यास मोठी दुर्घटना होईलच, शिवाय विजेची उपकरणेही जळून खाक होतील, असे या परिसरातील नागरिकांनी सांगितले.
वीज मंडळ कार्यालय झाले खडबडून जागे
By admin | Published: June 08, 2017 1:09 AM