- विवेक चांदूरकर, अकोलादिवसेंदिवस महावितरणच्या ग्राहकांची संख्या वाढत असून, विजेचा वापरही वाढत आहे. गत दहा वर्षांमध्ये राज्यातील विजेची मागणी १२ हजार मेगावॅटने वाढली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने वीज निर्मितीवरही भर देण्यात येत आहे. दहा वर्षांमध्ये महानिर्मिती, केंद्रीय व खासगी ऊर्जानिर्मिती प्रकल्पांद्वारे वीज निर्मितीत दुपटीने वाढ झाली आहे. २००५-०६ मध्ये १२,४९६ मेगावॅट वीज निर्मिती होत होती, आता २३,५२८ मेगावॉट विजेची निर्मिती करण्यात येत आहे. अन्न, वस्त्र, निवारासोबतच आता वीजही मानवाची गरज झाली आहे. राज्यात सध्या २ कोटी ३० लाख वीज ग्राहक आहेत. २०१५ मध्ये मे महिन्यात सर्वात जास्त १७ हजार मेगावॉट विजेची मागणी नोंदविलीगेली. जसजशी विजेची गरज वाढत आहे, तसतशी विजेची निर्मितीही वाढविण्यावरही शासनाच्या वतीने भर देण्यात येत आहे. त्यामुळे गत दहा वर्षांमध्ये राज्यात शासकीय व खासगी अशा ३० विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून विजेची निर्मिती वाढविण्यावर भर देण्यात आला. यादरम्यान काही विद्युत निर्मिती केंद्रांची क्षमता वाढविण्यात आली, तर काही नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले.यामध्ये पारस, विंध्याचल, तारापूर, परळी, दाभोळ, सिपत, महालगाव, घाटघर, कोरबा, भुसावळ, खापरखेडा, अदानी पॉवर, इंडिया बुल्स आदी वीज निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. दहा वर्षांपूर्वी राज्यात १२ हजार ४९६ मेगावॉट विजेची निर्मिती होत होती. आता यामध्ये दुपटीने वाढ होऊन २३ हजार ५२८ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. दाभोळ येथील वीज निर्मिती मे २०१४ पासून बंद असल्यामुळे १९६७.०८ मे. वॉ. वीज उपलब्ध होत नाही.
दहा वर्षांत वीज निर्मितीत झाली दुपटीने वाढ
By admin | Published: August 27, 2015 1:38 AM