मुंबई : बेस्टची वीज चोरून त्याची विक्री करणाऱ्या तीन सराईत आरोपींना मंगळवारी वडाळा टी. टी. पोलिसांनी अटक केली. गेल्या अनेक वर्षांपासून हे आरोपी वीजचोरी करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार, ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये आणखी काही आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वडाळा येथील म्हाडा संक्रमण शिबिर परिसरात राहणारे फारुख खान (२८), किशोर सोलंकी आणि कृष्णा चिपळूणकर (२७) हे तीन आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून बेस्टच्या विजेची चोरी करत होते. हीच वीज येथील झोपड्यांमध्ये देऊन येथील झोपडीधारकांकडून पैसे उकळले जात होते. गेल्या अनेक वर्षांपासून या आरोपींचा अवैधरीत्या वीजचोरीचा व्यवसाय सुरू होता. याचा फटका मोठ्या प्रमाणात बेस्टला बसत होता. याबाबत काही तक्रारी आल्यानंतर बेस्टने या ठिकाणी कारवाई करण्याचे ठरविले. त्यानुसार, त्यांनी वडाळा टी. टी. पोलिसांची मदत घेत, मंगळवारी बेस्टने या ठिकाणी छापा टाकला. या वेळी अनेकांच्या घरात चोरीचीच वीज असल्याचे या अधिकाऱ्यांना आढळून आले. परिसरात छापा पडल्याची माहिती या वीज माफियांना समजताच, त्यांनी परिसरातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलाग करून त्यांना अटक केली. वीज खंडित झाल्याने या परिसरात काही वेळ वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत रहिवाशांना शांत केले. चोरीच्या या व्यवसायात येथील आाणखी काही माफियांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या आरोपींनादेखील लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती वडाळा टी. टी. पोलिसांनी दिली आहे. (प्रतिनिधी) अनेकांच्या घरी चोरीची वीजबेस्टने टाकलेल्या छाप्यात अनेकांच्या घरी चोरीचीच वीज असल्याचे आढळून आले.छापा टाकल्याचे समजताच वीजमाफियांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली.
वीजचोरी करणारे त्रिकूट गजाआड
By admin | Published: May 19, 2016 2:39 AM