ठाणे : डायघर आणि तळोजा डम्पिंगचा प्रश्न बारगळल्याने पालिकेने १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आपला मोर्चा शीळ येथील वन विभागाच्या हद्दीत असलेल्या बंद दगडखाणीच्या ठिकाणी वळवला आहे. वन खात्याने परवानगी दिल्यानंतर आता पर्यावरण विभागानेही यावर शिक्कामोर्तब केल्याने अखेर पुढील आठवड्यात ही जागा पालिकेच्या ताब्यात येणार आहे. त्यानुसार, पालिका येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून वीजनिर्मिती करणार आहे. याशिवाय, प्रभागस्तरावर आणि इतर माध्यमातून विविध प्रकारच्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प राबवले जाणार असल्याने भविष्यात पालिकेला ४०० मेट्रीक टन कचऱ्याचीच विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. महापालिका क्षेत्रात आजघडीला ७०० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. परंतु, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला अद्यापही डम्पिंग उपलब्ध झालेले नाही. २००४मध्ये शासनाकडून पालिकेला डायघर येथील १८.८९ हेक्टर जमीन मिळाली आहे. तीवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मे. हेंजर बायोटेक एनर्जीज लि. या संस्थेबरोबर २००८मध्ये करारनामा केला होता. परंतु, स्थानिकांचा विरोध झाल्याने तो प्रकल्प बासनात गुंडाळावा लागला. त्यामुळे सध्या पालिका दिवा येथे कचरा टाकत आहे. परंतु, येथील नागरिकांचा विरोध वाढल्याने पालिकेने तोही प्रकल्प गुंडाळला होता. मात्र, आता कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेतला असून, मौजे शीळ येथील बंद असलेल्या दगडखाणीच्या ठिकाणी हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यानुसार, या प्रकल्पाला स्थायी आणि महासभेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. वन विभागाच्या हद्दीत ही जागा असून, याला आता त्यांनी मान्यता दिली आहे. तसेच जिल्हाधिकारी स्तरावरील समितीनेदेखील याला हिरवा कंदील दिला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदूषण मंडळानेदेखील याला ना-हरकत प्रमाणपत्र दिले आहे; आणि पर्यावरण व वन विभागाकडूनदेखील मान्यता मिळाली आहे. त्यानुसार, आता या प्रकल्पाचे काम सुरू केल्यानंतर दोन वर्षांचा कालावधी जाणार असून, यासाठी २२ लाखांचा खर्च करून सल्लागारदेखील नेमला आहे.आता सर्व अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर पुढील आठवड्यात पालिकेच्या ताब्यात ही जागा येणार आहे. शहरातून सुमारे १२५ सोसायट्यांकडून जमा केलेला १०० मेट्रीक टन ओला, सुका कचरा गोळा केला जात आहे. आता हाच कचरा या जागेवर टाकला जाणार असून, रिसायकल पद्धतीने येथे कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे; आणि त्यातून वीजनिर्मिती केली जाणार आहे. हक्काचे डम्पिंग ग्राउंड मिळत नसल्याने आता महापालिकेने डी-सेंट्रलाइज पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार वूड टू वेस्ट हा प्रकल्पही कार्यान्वित झाला आहे. त्याशिवाय, येत्या काही महिन्यांत त्या-त्या प्रभाग समितीमध्येच कचऱ्याचे विविध स्वरूपाचे २ ते ५ टनापर्यंतचे प्रकल्प उभारून त्यापासून बायोगॅस, कम्पोस्टिंग आणि गांडूळ खत प्रकल्पाचे प्लांट उभारले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. याशिवाय ई वेस्ट, जैविक खत प्रकल्प आदींसह विविध स्वरूपाचे प्रकल्पही मार्गी लागण्याच्या बेतात आहेत. >निविदाही अंतिम टप्प्याततळोजाचा प्रकल्प बारगळल्याने पालिकेने पुन्हा डायघरसाठी हालचाली सुरू केल्या असून, येथे कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. त्याच्या निविदाही अंतिम झाल्या असून, लवकरच तोही मार्गी लागणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे.
ठामपा करणार कचऱ्यापासून वीजनिर्मिती
By admin | Published: May 20, 2016 2:45 AM