गडचिरोली : तब्बल ३८ वर्षे नक्षल चळवळीत राहून सदस्य ते दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सदस्य अशी वाटचाल करत ६६ गुन्हे दाखल असलेल्या जहाल महिला माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य भूपती याची पत्नी विमला चंद्रा सिडाम उर्फ तारा उर्फ वत्सला उर्फ तारक्का हिच्यासह ११ जणांनी १ जानेवारीला शस्त्र खाली ठेवले व संविधान हाती घेऊन सन्मानाने जीवन जगण्याची शपथ घेतली.
तीन विभागीय समिती सदस्य, दोन एरिया समिती सदस्य, एक उपकमांडर व चार दलम सदस्य यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सर्वांचे आत्मसमर्पण झाले. या सर्वांवर सुमारे १ कोटी ३ लाख रुपयांचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर या सर्वांचे शासनाकडून पुनर्वसन होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पोलिस दलाला ५ बस, १४ चारचाकी, ३० मोटारसायकलचे लोकार्पण करण्याचे आले. पोलिस दलाच्या नूतन हेलिकॉप्टर हॅंगरचे उद्घाटनही करण्यात आले. विविध नक्षल चकमकींत शौर्य दाखविणाऱ्या सी-६० च्या जवानांचा गौरव करण्यात आला.
माओवादी विचारसरणीला थारा नाही : फडणवीससरत्या वर्षात उत्तर गडचिरोली माओवादापासून मुक्त झाली, लवकरच दक्षिण गडचिरोली सुद्धा होईल. गेल्या ४ वर्षांत एकही युवक किंवा युवती माओवादी चळवळीत सहभागी झाली नाही, ही फार मोठी उपलब्धी आहे. ११ गावांनी नक्षलवाद्यांना बंदी केली आहे. न्याय मिळायचा असेल, तर भारतीय संविधानानेच मिळू शकतो, तो माओवादी विचारसरणीने मिळू शकत नाही, हे जनतेला आता पटले आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एक हजार कोटींच्या शेअर्सचे वाटप- लॉईड कंपनीद्वारे कर्मचाऱ्यांना एक हजार कोटी रुपयांचे शेअर्स देण्यात आले.- कंपनीच्या कामाच्या गतीमुळे पुढील पाच वर्षांत शेअर्सचे मूल्य पाच पटीने वाढेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. - यावेळी पद्मश्री डॉ. तुलसी मुंडा यांना फडणवीस यांच्या हस्ते कंपनीच्या १० हजार शेअर्सचे प्रमाणपत्र देण्यात आले.
यांनी केले आत्मसमर्पण तारक्कासह विभागीय समिती सदस्य सुरेश बैसागी उउईके उर्फ चैतू उर्फ बोटी, कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी, अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश, एरिया कमिटी सदस्य वनिता सुकलु धुर्वे उर्फ सुशीला, सम्मी पांडु मट्टामी उर्फ बंडी, उपकमांडर निशा बोडका हेडो उर्फ शांती, दलम सदस्य श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, शशिकला पत्तीराम धुर्वे उर्फ श्रुती, सोनी सुक्कु मट्टामी, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते.
गडचिरोलीत पहिला दिवस; एसटीतून प्रवास नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीत जिल्ह्यातच व्यतित केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच अहेरी ते गर्देवाडा अशी एसटी बससेवेचा त्यांनी शुभारंभ केला आणि त्या बसमधून प्रवासही केला.
कोनसरी (ता.चामोर्शी) येथे लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या (लॉईड) विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. या प्रकल्पामुळे ६,२०० कोटींची गुंतवणूक जिल्ह्यात झाली असून ९ हजार लोकांना रोजगार मिळत आहे.