- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जून महिन्याच्या सुरुवातीला सुरू झालेल्या अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार असून, त्याआधी तब्बल १ लाख १२ हजार ६० विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याची माहिती शिक्षण विभाग उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली. सोमवार, १२ जूनपर्यंत अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा पहिला अर्ज १ लाख १२ हजार ६० विद्यार्थ्यांनी भरला आहे. त्यापैकी १७ हजार ४१८ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, ५७ हजार ३३१ विद्यार्थ्यांचे अर्ज बरोबर असल्याची नोंदणी करण्यात आली आहे. ९४ हजार ६४२ अर्जांची पडताळणी होणे अजूनही बाकी आहे. एसएससी बोर्डाच्या १ लाख १ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्याखालोखाल आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. ६ हजार ९१७ आयसीएसई आणि २ हजार ७७२ सीबीएसईच्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. एसएससी बोर्डच्या १३ हजार ८९३ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, ५७ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी माहिती बरोबर असल्याचे स्पष्ट केले आहे. अजूनही ८७ हजार ४९२ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी करायची असल्याचे उपसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.