पुणे : पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या ५२ हजार विद्यार्थ्यांपैकी मंगळवारी २१ हजार १४० विद्यार्थ्यांनी ५० रुपये भरून आपला प्रवेश निश्चित केला. मंगळवारी प्रवेशाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयात गर्दी केली होती. मात्र, शहरात अधून-मधून पावसाच्या सरी येत असल्याने विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली. पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. अकरावी प्रवेश नियंत्रण समितीतर्फे सोमवारी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र, प्रवेशाच्या पहिल्या दिवशी केवळ ६ हजार ३३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते.परंतु, प्रवेश न घेणारे विद्यार्थी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाणार असल्याने दुसऱ्या दिवशी तब्बल २१ हजार १४० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेतले. पुणे विभागीय कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार पहिल्या गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली आहे. येत्या २९ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराममहाराज यांच्या पालख्या पुणे शहरात दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरातील काही भागातील वाहतूक बंद केली जाणार असून काही भागातील वाहतूक वळवली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी वाहतूकव्यवस्थेचा विचार करून प्रवेश घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना ३० जूननंतर प्रवेश घेण्यास मुदतवाढ दिली जाणार नाही. प्रवेश मिळूनही प्रवेश न घेणारे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर जाणार आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत प्रवेश घ्यावाच लागणार आहे.पहिल्या गुणवत्ता यादीतून ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात विज्ञान शाखेत प्रवेश मिळालेल्या २३ हजार ११० विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५६८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. वाणिज्य (इंग्रजी) शाखेत प्रवेश मिळालेल्या १० हजार ५६८ विद्यार्थ्यांपैकी केवळ ५ हजार ४६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले, तर वाणिज्य मराठीमध्ये ९ हजार ६०६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. कला शाखेच्या (मराठी) ४ हजार ८९६ पैकी १ हजार ४२८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
अकरावीत २१ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश
By admin | Published: June 29, 2016 12:55 AM