मुंबई : यंदा मुंबई, पुण्यात अकरावीची प्रवेश प्रक्रिया रडतखडत आॅनलाइनद्वारे पूर्ण झाल्यावर पुढच्या शैक्षणिक वर्षात २०१७-१८मध्ये नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथेही अकरावी प्रवेश आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हायर सेकंडरी व्होकेशनल कोर्सेसचे सर्व प्रवेशदेखील आॅनलाइन पद्धतीनेच देण्यात येणार आहेत. त्याशिवाय विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेशअर्ज भरताना किमान १ ते कमाल १० कॉलेजांचा पर्याय देता येईल. अकरावी आॅनलाइन प्रक्रियेतून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकावेळी एका प्रवेश अर्जाद्वारे कला, विज्ञान, वाणिज्य शाखांपैकी फक्त एकाच शाखेची मागणी करता येणार आहे. तर, विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार प्रवेश अर्जातील भाग २मध्ये शाखा बदलून पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येणार आहे. याआधी आॅनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना ५० महाविद्यालयांचा पसंतीक्रम देण्याची मुभा होती. पण, आता विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश अर्ज भरताना पहिल्या फेरीत संबंधित महानगरपालिका क्षेत्रातील कोणतेही किमात १ ते कमाल १० उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम देता येतील. पहिली फेरी पूर्ण झाल्यावर मात्र १ ते १० पसंतीक्रमाची अट राहणार नाही. कोणत्याही कारणास्तव अकरावीत झालेले प्रवेश रद्द झाल्यास महाविद्यालयांना त्याची नोंद संकेतस्थळावर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिल्या प्रवेश फेरीनंतर विद्यार्थ्याला उपलब्ध रिक्त जागांनुसार फेरीपूर्वी निश्चित केलेला पसंतीक्रम बदलता येणार आहे. दिलेल्या कालावधीत विद्यार्थ्याने पसंतीक्रम बदलला नाही तर आधीच्या पसंतीक्रमाप्रमाणेच त्याला प्रवेश देण्यात येईल. पहिला पसंतीक्रम दिलेल्या महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यास त्याला संपूर्ण शुल्क भरून प्रवेश घेणे बंधनकारक राहील. पहिल्या पसंतीक्रमाव्यतिरिक्त अन्य महाविद्यालयात विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यास पूर्ण शुल्क भरून तो प्रवेश घेऊ शकतो. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील यादीत समाविष्ट होणार नाहीत. तर, महाविद्यालयात प्रवेशासाठी नाव लावल्यावर देखील प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या यादीत पसंतीक्रम बदलता येणार नाही. इयत्ता अकरावीत प्रवेश घेणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीनेच होणार आहे. अशा असतील राखीव जागा...शासनाच्या समान आरक्षण धोरणानुसार, महिलांसाठी ३० टक्के, अपंगांसाठी ३ टक्के, प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्तांसाठी ५ टक्के, क्रीडा व कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ३ व २ टक्के, बदलीने आलेल्या राज्य, केंद्र, खासगी क्षेत्रातील कर्मचारी, पाल्य, आजी-माजी सैनिकांच्या पत्नी, पाल्य, स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य यांच्यासाठी ५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)कधी होणार आॅनलाइन प्रवेश सुरू?आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रत्येक आठवड्याला एक याप्रमाणे चार नियमित फेऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. १५ जून ते १५ जुलै या कालावधीत चार फेऱ्या घेण्यात येणार आहेत. १५ जुलै ते १ सप्टेंबर या कालावधीत दोन आठवड्यांत एक याप्रमाणे तीन अतिरिक्त फेऱ्या होतील.
अकरावी प्रवेश : आता १० कॉलेजांचाच पर्याय
By admin | Published: January 10, 2017 5:09 AM