लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद या महापालिका क्षेत्रांतील सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) फेऱ्यांचे आयोजन करण्याला मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबत अध्यादेश काढला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षातील प्रवेश प्रक्रिया जुलै २०२० पासून सुरू झाली. विलंबित प्रक्रियेमुळे अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्यासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत बदल करण्यात आले. त्यात ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ ही फेरी रद्द करण्यात आली. मात्र विशेष फेरीस होणारा विलंब आणि प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांची वाढती संख्या यामुळे एफसीएफएस फेरीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बुधवारी ट्विटरद्वारे माहिती दिली. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी याबाबत नवा अध्यादेश काढला. त्यामुळे उर्वरित प्रवेशास ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरीअंतर्गत प्रवेश दिला जाणार आहे.
दुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेशांना मुदतवाढदुसऱ्या विशेष फेरीतील प्रवेशासाठी मुंबई विभागातून २१,८३५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. तर प्रवेश निश्चितीस ८ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी वेळ वाढवून मागितल्याने ८ जानेवारीपर्यंत त्यांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ पर्यंत आपले दुसऱ्या फेरीचे प्रवेश निश्चित करू शकणार आहेत.