मुंबई : अकरावीचे वर्ग सुरू होऊन अर्धे वर्ष झाले तरी अद्याप अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. अनेक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रवेशासाठी त्यांना उपसंचालक कार्यालयात अर्ज करावा लागत आहे. प्रवेश होणार कधी आणि शिकवलेला अभ्यास समजणार कसा, असे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांपुढे आहे.
अकारावी प्रवेशाच्या तब्बल ११ फेऱ्या झाल्या. एवढ्या फेºया होऊनही अनेक विद्यार्थी प्रवेशासाठी धडपडत आहेत. ज्यांना प्रवेश मिळाले नाहीत त्यांना शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडे लेखी अर्ज करावा लागत आहे. आतापर्यंत अशा प्रकारे कार्यालयात १० अर्ज आले आहेत. त्याची दखल घेऊन शिक्षण उपसंचालक कार्यालयाने विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत विद्यार्थ्यांना दूरध्वनी करून बोलावण्यात येईल. त्यांचे समुपदेशन करण्यात येईल. शक्य झाल्यास त्यांच्या अर्जाप्रमाणे त्यांना अभ्यासाची शाखा किंवा बोर्ड बदलून देण्यात येईल. विद्यार्थ्याला प्रवेश देण्याची तयारी एखाद्या महाविद्यालयाने दाखवल्यास त्याला नियमानुसार प्रवेश देण्यात येईल. ही प्रक्रिया आॅनलाइन होईल, असे शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी सांगितले.पुढील वर्षी प्रवेश प्रक्रियेत सुधारणाप्रवेशासाठी यंदा झालेला गोंधळ लक्षात घेता, पुढील वर्षापासून ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीतर्फे या प्रक्रियेत काही सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. या सुधारणांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.